शिक्षकांच्या कायम सेवेचा प्रस्ताव शासनाकडे सादर

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका प्रशासनात ठोक मानधनावर काम करणार्‍या शिक्षकांच्या कायम सेवेबाबतचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडे राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. ठोक मानधनावरील कामगारांची सेवा कायम व्हावी यासाठी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी महापालिका प्रशासनाकडे सतत पाठपुरावा केला होता. 

 महापालिकेने ठोक मानधनावरील कामगारांच्या कायम सेवा करण्याविषयीच्या प्रस्तावामध्ये ठोक मानधनावर काम करणार्‍या शिक्षकांचा समावेश नव्हता. संबंधित शिक्षकांनी कामगार नेते रवींद्र सावंत यांच्या नेरूळ येथील कार्यालयात धाव घेवून संबंधित प्रस्तावामध्ये आपल्याही कायम सेवेचा समावेश करण्याची मागणी केली होती. याविषयी सावंत यांनी ठोक मानधनावरील शिक्षकांचाही कामगारांच्या कायम सेवेत समावेश करण्याची विनंती महापालिका प्रशासनाला केली. तसेच याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यासाठी पाठपुरावा सुरू केला. सावंत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या या विषयावर अनेकदा भेटीगाठी घेत शिक्षकांच्या प्रस्तावाबाबत वारंवार मागणी केली. अखेरिला ठोक मानधनावर काम करणार्‍या 138 शिक्षकांच्या कायम सेवेबाबतचा प्रस्ताव 15 डिसेंबर 2020  रोजी राज्य सरकारकडे पाठविला व 16 डिसेंबर 2020 रोजी नवी मुंबई इंटक अध्यक्ष रवींद्र सावंत यांना लेखी पत्रान्वये ‘आपल्या मागणी व पाठपुराव्यानुसार’  संबंधित शिक्षकांच्या कायम सेवेचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला असल्याचे महापालिका प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

ठोक मानधनावरील कर्मचार्‍यांची सेवा अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कायम होत असताना नवी मुंबई महापालिकेनेही ठोक मानधनावरील कर्मचार्‍यांची सेवा कायम करावी यासाठी रवींद्र सावंत यांनी महापालिका प्रशासन व मंत्रालयादरम्यान सातत्याने पाठपुरावाही केला. त्याअनुषंगाने पालिकेने कर्मचार्‍यांच्या कायम सेवेसाठी राज्य सरकारकडे प्रस्तावही पाठवून दिला. या प्रस्तावाला राज्य सरकारकडून मंजुरी मिळावी यासाठी काँग्रेसच्या मातब्बरांसह विधानसभा अध्यक्ष नाना पटोळे यांच्या भेटीगाठी घेवून सहकार्य करण्याचे साकडे घातले आहे.