बेपत्ता अडीच वर्षीय मुलीचा मृतदेह सापडला पाण्याच्या टाकीत

खेळताना पाण्याच्या टाकीत पडल्याचा दावा

नवी मुंबई : ऐरोली सेक्टर-9 मधील राधाकृष्ण अपार्टमेंट या इमारतीच्या आवारातून गत 10 डिसेंबर रोजी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास बेपत्ता झालेल्या अडीच वर्षीय निकिता राजेश सिंग या मुलीचा मृतदेह मंगळवारी सकाळी बाजुच्या इमारतीतील पाण्याच्या टाकीत सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. निकिता खेळता-खेळता बाजुच्या इमारतीतील पाण्याच्या टाकीजवळ गेली असताना, तिचा सदर पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज मिळाल्याचे देखील पोलिसांनी सांगितले.  

या घटनेतील मृत निकिता सिंग ही अडीच वर्षीय मुलगी ऐरोली सेक्टर-9 मधील राधाकृष्ण अपार्टमेंट या इमारतीतील सुरक्षारक्षक राजेश सिंग याची मुलगी असून राजेश सिंग हा त्याच इमारतीत तळ मजल्यावरील छोट्या खोलीत आपल्या कुटुंबासह रहाण्यास आहे. गत 10 डिसेंबर रोजी त्याची मुलगी निकिता ही इमारतीच्या आवारात खेळत असताना अचानक गायब झाली होती. त्यामुळे सदर इमारतीतील सर्व रहिवाशांनी निकिताचा शोध घेतला होता. मात्र ती कुठेच सापडली नव्हती. त्यामुळे निकिताच्या पालकांनी रबाळे पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार  दाखल केली होती.  

त्यानंतर पोलिसांनी बेपत्ता निकिताचा शोध घेण्यास सुरुवात केली असतानाच, मंगळवारी सकाळी निकिता ज्या इमारतीत राहात होती, त्या इमारती शेजारील माऊली अपार्टमेंटच्या तळमजल्यावर असलेल्या पाण्याच्या टाकीतून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर रहिवाशांनी त्या ठिकाणी जाऊन पहाणी केली असता, त्यात निकिताचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळुन आला. या घटनेची माहिती मिळताच रबाळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी निकिताचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून दिला.  

दरम्यान, निकिता बाजुच्या इमारतीतील पाण्याच्या टाकीत कशी पडु शकते? असा प्रश्न तेथील रहिवाशांकडून उपस्थित करण्यात येत आहे. तसेच निकिताला कुणीतरी सदर पाण्याच्या टाकीत नेऊन टाकले असावे अशी शक्यता रहिवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे. 

मात्र या प्रकारात कुठल्याही प्रकारचा घातपात नसून निकिता स्वत: खेळता-खेळता  बाजुच्या इमारतीतील पाण्याच्या टाकीजवळ गेल्याचे व ती स्वत: पाण्याच्या टाकीत पडल्याचे  रबाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश गावडे यांनी सांगितले. निकिता पाण्याच्या टाकीजवळ एकटी जातानाचे सीसीटीव्ही फुटेज मिळाल्याचे व पाण्याच्या टाकीचे झाकण त्या दिवशी उघडे असल्याचेही गावडे यांनी सांगितले.