नवी मुंबईत साकारली शरद पवार यांची महारांगोळी

नवी मुंबई : देशाचे लाडके नेते शरद पवार यांचा 80 वा वाढदिवस सर्वत्र आठवडाभर मोठा थाटामाटात साजरा झाला. विविध ठिकाणी रक्तदान शिबिरे तसेच इतर सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पुरस्कृत व आगरी कोळी संघर्ष समिती नवी मुंबईच्यावतीने 80 व्या वाढदिवसा निमीत्त शरद पवार यांच्या महारांगोळी चे आयोजन करण्यात आले होते. ऐंशी बाय ऐंशी फुटाची महारांगोळी शनिवार, 19 रोजी सुप्रसिद्ध कलाकार श्रीहरी पवळे व त्यांचे विद्यार्थी यांनी साकारली. 6400 चौरस फूट ही आकर्षक महारांगोळी सानपाडा येथील गावदेवी मैदानामध्ये रेखाटण्यात आली.

या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती देताना रुपेश हिराजी ठाकूर, जिल्हा अध्यक्ष ओबीसी सेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, नवी मुंबई यांनी सांगितले की आम्ही साहेबांच्या आणि 80व्या वाढदिवसाचे औचित्य साधून आम्ही असा कार्यक्रम करु इच्छित होतो की नव्या पिढीला प्रेरणा मिळावी. हीच गोष्ट लक्षात घेता साहेबांची महारांगोळी तसेच त्यांचे राजकीय आत्मकथा लोक माझे सांगाती चे वाचन ध्वनीक्षेपावर करण्यात आले. या कार्यक्रमाला विशेष सहकार्य 40 प्लस गावदेवी क्रिकेट संघ सानपाडा यांचे लाभले. यावेळी कै.जयंत शांताराम सुतार यांच्या स्मरणार्थ सफाई कामगार (सानपाडा मर्यादित) यांना दोन किलो गव्हाचे पीठ व एक किलो साखर वाटप करण्यात आली.

यावेळी विधानपरिषद आमदार शशिकांत शिंदे, प्रदेश सरचिटणीस व नवी मुंबई निरीक्षक प्रशांत पाटील, प्रदेश चिटणीस मल्लिकार्जुन पुजारी, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक गावडे, नवीमुंबईचे एनसीपी कार्याध्यक्ष जी एस पाटील, उद्योजक मंगेश आमले, नगरसेवक सोमनाथ वास्कर, माजी नगरसेवक राजू शिंदे, माजी नगरसेवक संदीप सुतार, महिला जिल्हाध्यक्ष रोहिणीताई घाडगे, पालघर निरिक्षक सुनीताताई देशमुख, न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष  इंदर शेंडगे, सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष संतोष आहेर, लीगल सेलचे जिल्हाध्यक्ष विशाल पाताडे, युवा जिल्हाध्यक्ष राजेश भोर, युवक कार्याध्यक्ष सौरभ काळे, युवती जिल्हाध्यक्ष श्वेता खरात, कामगार व माथाडी सेलचे जिल्हाध्यक्ष अनु आंग्रे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व नागरिक शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते.