ऐरोली-काटई मार्गावरील दुसर्‍या बोगद्याच्या कामाला सुरुवात

ऐरोली-काटई  मार्गावरील दुसर्‍या बोगद्याच्या कामाला सुरुवात

नवी मुंबई ः ठाणे-बेलापूर एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्पाच्या उभारणीतील महत्वाचा टप्पा असलेल्या ऐरोली-काटई मार्गाच्या दुसर्‍या टनेलच्या ब्लास्टिंग प्रक्रियेला 24 डिसेंबर रोजी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली. दीड कि.मी. लांबीच्या या बोगद्याद्वारे येणार्‍या काळात ऐरोली ते काटई हा प्रवास अवघ्या 10 मिनिटात करणे शक्य होईल, हा विश्‍वास यावेळी मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.  

मुंबई महानगर क्षेत्रातील रस्ते, उड्डाणपुलांचे जाळे सक्षम व्हावे यासाठी महानगर विकास प्राधिकरणाने आखलेल्या विविध प्रकल्पांमध्ये ऐरोली ते काटई नाका या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा समावेश करण्यात आला आहे. ऐरोली ते मुंब्रा वाय जंक्शन आणि मुंब्रा वाय जंक्शन ते कटाई अशा दोन टप्प्यात हे काम पूर्ण होणार आहे. त्यासाठी 1.8 किलोमीटरचा बोगदा बनवण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यातील रस्ता हा ऐरोलीच्या खाडी पुलाजवळ सुरू होईल तो थेट मुंब्र्यातील वाय जंक्शनपर्यंत असेल. दुसर्‍या टप्प्यात याच रस्त्याला जोडून एलिव्हेटेड मार्ग तयार करण्यात येईल जो थेट कटरिना नाका इथे उतरेल. या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर नागरिकांचा प्रवास अधिक वेगवान होणार आहे. कारण, या प्रकल्पाच्या पूर्णत्वानंतर काटई ते ऐरोली हा प्रवास फक्त 10 मिनिटांत पूर्ण होणार आहे.  हा रस्ता 12 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचा असून त्यातील बोगदा 1.8 किलोमीटर इतका आहे. महाराष्ट्रातील हा सर्वात मोठा रस्त्याचा बोगदा असल्याचे सांगितले जात आहे. हा मार्ग मुंब्रा बाह्यवळण रस्त्याच्या वाय जंक्शन येथे जोडणार असून त्याद्वारे शीळफाटा मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.