इंग्लडहून आलेल्या प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण

25 नोव्हेंबरनंतर इंग्लडहून आलेल्या व्यक्तींनी पालिकेशी संपर्क साधण्याचे आवाहन

नवी मुंबई : ब्रिटनसह युरोपीय देशांमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळल्यानंतर राज्यात देशाबाहेरून येणार्‍या नागरिकांबाबत विशेष खबरदारी घेतली जात आहे. केंद्र व राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर या कालावधीत इंग्लडहून आलेल्या प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण करण्यात येत आहे. या अंतर्गत 25 नोव्हेंबरनंतर इंग्लडहून आलेल्या व्यक्तींनी नवी मुंबई महापालिकेशी संपर्क साधण्याचे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेनेही एक आदेश जारी केला आहे. त्यानुसार 25 नोव्हेंबर नंतर नवी मुंबईत आलेल्या व्यक्तींच्या सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. त्यासाठी पालिकेकडून अशा लोकांची यादी तयार केली जात असून त्यांच्याशी संपर्क साधण्याचे काम सुरु आहे. ज्या व्यक्ती 25 नोव्हेंबर नंतर इंग्लंडवरून नवी मुंबईत आल्या आहेत त्यांनी स्वत:हून नवी मुंबई महानगरपालिकेच्या नजीकच्या आरोग्य केंद्राशी / आरोग्य विभाग मुख्यालयाशी संपर्क साधून अथवा 1800222309 / 1800222310 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून या विशेष सर्वेक्षणात सहकार्य करणे आवश्यक असल्याचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले. सदर व्यक्तींकरिता आरटी-पीसीआर चाचणी सुविधा एमजीएम रूग्णालय, सेक्टर 30, सानपाडा, वाशी येथे करण्यात आलेली आहे.