गोळीबार करून फरार झालेले आरोपी जेरबंद

पनवेल : कामोठे परिसरात गोळीबार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करून फरार झालेल्या आरोपींना अवघ्या चार तासांत कामोठे पोलिसांनी जेरबंद केले आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेल्या वस्तू हस्तगत करण्यात आल्या आहे. कामोठे वसाहतीमध्ये मयुर बबन जाधव (वय 27) व त्याचा मोठा भाऊ योगेश बबन जाधव (वय 39) हे देशी ढाबा या हॉटेलमध्ये या आपल्या मित्रासह मद्यप्राशन करीत असताना त्यांच्यात जुन्या ओळखीचे मॅडी उर्फ मधुकुमार सुदन व त्यांचे साथीदार राकेश ठाकूर, मोहन गवडा, विजय नाडर, अली, थापा, तेजस, गौरव, अमय, नंदकिशोर हे देखील त्या ठिकाणी बसले होते. त्यांच्यात किरकोळ कारणावरुन वाद निर्माण झाला. याचा राग मनात धरुन जाधव बंधू हॉटेल बाहेर आल्यावर आरोपी व्यक्तींनी आपसात संनगमत करून बेकायदेशीर जमाव जमवून त्यांना मारहाण केली. तसेच यातील अली या आरोपीने पिस्तुल काढून पहिल्यांदा हवेत फायर करून दुसरा फायर मयुर जाधव याला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्या दिशेने केला. परंतु मयुर जाधव याने तो चुकविल्याने त्याला गोळी लागली नाही. त्यानंतर या आरोपींनी त्यांच्या डोक्यात दगड मारुन त्यांना गंभीर जखमी केले. त्यांच्या ताब्यातील टाटा नेक्सॉन गाडी व इतर दोन गाड्या व मोटरसायकलवरुन पळून गेले. याबाबतची तक्रार कामोठे पोलीस ठाण्यात दाखल होताच पोलिसांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज, मोबाइल फोन व गुप्त बातमीदाराद्वारे अवघ्या चार तासांत या आरोपींना कोपरखैरणे, सानपाडा, नेरूळ व कामोठे परिसरातून ताब्यात घेतले आहे. तसेच आरोपींकडील गुन्ह्यात वापरणारा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील व सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र गिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि संजय पाटील, गुन्हे पोलीस निरीक्षक उत्तम जगदाळे, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि महाला, पो.ह.वा.संजय पाटील, पो.ना.पवार, काळे, पाटील, काळे आदींच्या पथकाने चार तासात या आरोपीच्या मुसक्या आवळल्याने त्यांच्या या उत्कृष्ठ कामगिरीचे कौतुक होत आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी पसार असून त्याचा शोध पोलीस निरीक्षक गुन्हे उत्तम जगदाळे करीत आहेत.