डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाला मिळणार गती

नवी मुंबई : नवी मुंबई आणि महाराष्ट्रातील जनतेसाठी प्रेरणादायी असणार्‍या ऐरोली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या बांधकामाला गती मिळणार आहे. करोना नियंत्रण विषयक आमदार गणेश नाईक यांची आढावा बैठक मंगळवारी पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याबरोबर पालिका मुख्यालयात पार पडली. या बैठकीमध्ये नाईक यांनी डॉक्टर आंबेडकर स्मारकाचा विषय उपस्थित करून स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी केली.  

या स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होऊन त्याचे लोकार्पण करण्यात आले आहे मात्र उर्वरित काम अद्याप पूर्ण व्हायचे आहे. यासंदर्भात आमदार नाईक, महापालिका आयुक्त बांगर आणि संबंधित पालिका अधिकाऱयांची एक आढावा बैठक जानेवारीच्या पहिल्या आठवडयात घेण्याचे बैठकीत ठरले आहे. या स्मारकाच्या कामाची सद्यस्थिती आणि त्यामध्ये असणाऱया अडचणी याविषयी या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. नवी मुंबई शहराच्या सर्वांग़ीण विकासासाठी सिडको आणि एमआयडीसी या प्राधिकरणाचे योगदान तेवढेच महत्त्वाचे आहे. त्यांनीही योगदान द्यावे यासाठी या प्राधिकरणांना पत्र पाठविणार आहे. त्यांच्याबरोबर बैठका घेणार आहे. हे सर्व करुनही त्यांच्याकडून अपेक्षित सहकार्य मिळाले नाही तर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील नाईक यांनी या यावेळी दिला.  या बैठकीस माजी खासदार संजीव नाईक माजी आमदार संदीप नाईक माजी महापौर सागर नाईक, जयवंत सुतार, सुधाकर सोनावणे, रवींद्र इथापे, दशरथ भगत, अनंत सुतार आदी मान्यवर उपस्थित होते.