महिन्याभरापुर्वी झालेल्या हत्येचा लागला छडा

नवी मुंबई : एपीएमसीच्या हद्दीत कचर्‍याच्या ढिगार्‍यामध्ये कुजलेल्या अवस्थेत सापडलेल्या प्रविण नायर (50) या व्यक्तीची हत्या त्याच्याच ओळखीतल्या प्रेमबहादुर लक्ष्मणबहादुर सावन (49) या नेपाळी व्यक्तीने केल्याचे उघडकिस आले आहे. गत रविवारी प्रविण नायर याचा कचर्‍याच्या ढिगार्‍यात मृतदेह सापडल्यानंतर महिन्याभरापुर्वी घडलेली हत्येची घटना उघडकिस आली आहे. त्यानंतर एपीएमसी पोलिसांनी तपास करुन 24 तासात आरोपी प्रेम बहादुर याला अटक केल्याची माहिती परिमंडळ-1चे पोलीस उपआयुक्त सुरेश मेंगडे यांनी दिली.  

या घटनेतील मृत प्रविण नायर हा पुर्वी पत्नी पारु शेख हिच्यासोबत एपीएमसी परिसरातील झोपडीत रहात होता. मात्र तो दारु पिण्यासाठी पारुकडे नेहमी पैशांची मागणी करुन तिच्यासोबत भांडण करत असल्यामुळे पारुने त्याला काही वर्षापुर्वी सोडून दिले होते. त्यामुळे प्रविण नायर हा दुसरीकडे निघून गेला होता. त्यानंतर पारु हिने प्रेमबहादुर सावन या नेपाळी सोबत घरोबा केल्यानंतर ती त्याच्यासोबत तेथील झोपडीत रहात होती. मात्र प्रविण नायर व प्रेमबहादुर हे दोघे एकमेकांच्या परिचयातील असल्याने ते दोघे एकत्र दारु प्यायचे. दिवाळी नंतर प्रविण नायर व प्रेमबहादुर हे दोघे रात्री उशीरापर्यंत पारुच्या झोपडीत दारु पिण्यासाठी बसले होते. त्याचवेळी त्यांच्यामध्ये शाब्दीक बाचाबाची झाल्यानंतर प्रेमबहादुर याने प्रविण नायर याला बेदम मारहाण केली होती.  

या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचे दुसर्‍या दिवशी सकाळी समजल्यानंतर प्रेमबहादुर याने त्याचा मृतदेह प्लास्टिकच्या बॅनरमध्ये गुंडाळून झोपडीपासून काही अंतरावर असलेल्या कचरा डेपोमध्ये टाकुन दिला होता. त्यानंतर त्याने पारुला सदर घटनेची माहिती कुणाल न सांगण्याची धमकी दिली होती. त्यानंतर तो पारु व मुलांसह मॅफको येथील झोपडीत रहाण्यास गेला होता. महिन्याभरानंतर गत रविवारी त्याचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडल्यानंतर एपीएसमी पोलिसांनी संशयावरुन सदर मृतदेहाबाबत चौकशीला सुरुवात केली. त्यासाठी एपीएमसी पोलिसांनी विशेष पथक तयार करुन आजुबाजुच्या झोपडपट्टीत सदर मृतदेहाबाबत चौकशी सुरु केली. या चौकशीदरम्यान, मृतदेह सापडलेल्या कचर्‍याच्या ढिगार्‍यापासून काही अंतरावर असलेल्या झोपडीत रहाणारी पारु नावाची महिला कोणाला काही न सांगता झोपडी सोडून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी संशयावरुन पारुचा शोध घेतला. त्यानंतर पोलिसांनी तिच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर तिचा दुसरा पती असलेल्या प्रेमबहादुर सावन यानेच तिचा पहिला पती प्रविण नायर याला मारल्याचे तसेच त्यानेच त्याचा मृतदेह कचर्‍यात टाकल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी नेपाळ येथे पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या प्रेमबहादुर याला अटक केली. अशी माहिती परिमंडळ-1चे पोलीस उपआयुक्त सुरेश मेंगडे यांनी दिली.