नोकरीचे आमिष दाखवून 88 हजारांचा गंडा

नवी मुंबई : लॉकडाऊच्या कालावधीत नोकरी गमावल्यामुळे नोकरी डॉट कॉमच्या माध्यमातून नोकरीचा शोध घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या व्यक्तीकडून अज्ञात टोळीने सुमारे 88 हजारांची रोख रक्कम उकळून त्यांची फसवणुक केल्याचा प्रकार उघडकिस आला आहे. पनवेल शहर पोलिसांनी या टोळी विरोधात फसवणुकिसह आयटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करुन या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे.  

या प्रकरणात फसवणुक झालेल्या व्यक्तीचे नाव गंगाराम नामदेव माळी (51) असे असून ते मिडलक्लास सोसायटीत रहाण्यास आहेत. ते तळोजा येथील ते काम करत असलेली कंपनी लॉकडाऊनमुळे बंद झाल्याने ते मागील पाच सहा महिने घरीच होते. त्यामुळे सप्टेंबरमध्ये त्यांनी नव्या नोकरीचा शोध घेण्यासाठी नोकरी डॉट कॉम या वेबसाईटवर आपली वैयक्तिक माहिती भरली होती. त्यानंतर काही दिवसांमध्येच हर्षिला मेहता नावाच्या महिलेने नोकरी डॉट कॉम मधुन बोलत असल्याचे सांगून माळी यांच्या मोबाईलवर संपर्क साधला. त्यानंतर सदर महिलेने नोकरीसाठी माळी यांना एक लिंक पाठवून त्यात त्यांना त्यांची व बँकेची माहिती भरण्यास सांगितले. त्यानुसार माळी यांनी माहिती भरुन पाठविली. तसेच 100 रुपये रजिस्ट्रेशन फि ऑनलाईन पाठविली. त्यानंतर काही वेळातच माळी यांना त्यांच्या खात्यातून 4586 हि रक्कम काढली गेल्याचा मेसेज आला. त्यामुळे त्यांनी हर्षिला मेहता या महिलेला संपर्क साधला असता, तीने माळी यांना त्यांची रक्कम परत मिळेल असे सांगुन त्यांना पुन्हा लिंक पाठवुन त्यात पुन्हा माहिती भरण्यास सांगितले. त्यानुसार माळी यांनी सदर माहिती भरल्यानंतर पुन्हा त्यांच्या खात्यातून 23 हजार 345 इतकी रक्कम काढली गेली. त्यानंतर पुन्हा सदर महिलेने अशाच पद्धतीने आणखी 20 हजार 765 रुपये व त्यानंतर रोहित अरोरा या व्यक्तीने देखील माळी यांना त्यांची सर्व रक्कम परत देण्याचे आश्‍वासन देऊन त्यांना ओटीपी पाठवून दिला. माळी यांनी पैसे मिळतील या आशेने सदर ओटीपी रोहित अरोरा याला दिल्यानंतर त्याने देखील 39 हजार 856 इतकी रक्कम माळी यांच्या खात्यातुन काढून घेतली. त्यानंतर दोघांनी आपले मोबाईल फोन बंद करुन टाकले. त्यानंतर आपली फसवणुक झाल्याचे माळी यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात याबाबत लेखी तक्रार दाखल केली होती. सदर तक्रारीची पोलिसांनी शहानिशा करुन मंगळवारी या गुह्यातील आरोपींविरोधात फसवणुकिसह आयटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल केला.