स्वच्छतेचे ध्येय ठेवतानाच लोकाभिमुख प्रशासनावर भर

नवी मुंबई ः कोव्हीड काळातील मागील वर्ष संपूर्ण जगासाठी अत्यंत क्लिष्ट व वेदनादायी होते. या संकट काळात स्वच्छ सर्वेक्षणामध्ये आपला देशात तृतीय क्रमांक आला ही एक सोनेरी किनार लाभली. पुढील काळात देशात पहिल्या क्रमांकाचे उद्दीष्ट नजरेसमोर ठेवून आपण वाटचाल करीत असताना ‘निश्चय केला - नंबर पहिला’ हे केवळ घोषवाक्य नाही तर ते आपले ध्येय झाले पाहिजे असे सांगत आपला पहिला नंबर येईल असे मनातून वाटले पाहिजे, मग त्यादृष्टीने संपूर्ण क्षमतेने प्रयत्न होतील, आणि मग अशक्य काही नाही अशा शब्दात मनोगत व्यक्त केले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या 29 व्या वर्धापनदिनानिमित्त मुख्यालयातील अ‍ॅम्फिथिएटर येथे अधिकारी, कर्मचारी यांच्याशी आयुक्तांनी थेट संवाद साधला.   

नागरिकांच्या सहभागाने देशातील प्रथम क्रमांकाच्या ध्येयासाठी एकजुटीने प्रयत्न करुया असा निर्धार आयुक्तांनी व्यक्त केला. यादृष्टीने ‘झ्रिरो गार्बेज ऑन रोड’ हे ध्येय निश्चित करुन अगदी छोटयातील छोट्या तक्रारीचेही 100% निवारण झाले पाहिजे असे त्यांनी सांगितले.  वर्धापनदिनाच्या निमित्ताने अधिकारी-कर्मचारी यांनी नागरिकांशी सौजन्याने वागावे व महानगरपालिकेच्या नोकरीत आपले उत्तरदायित्व लोकांप्रती आहे या कर्तव्याची जाणीव ठेवून वर्तणूकीत व कामाच्या पध्दतीत बदल करण्याचा संकल्प करावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पु.ल.देशपांडे व व.पु.काळे यांच्या साहित्यातील उदाहरणे देत महानगरपालिकेमध्ये कामे वेळेत होत नाहीत हे 1960 च्या दशकातील लोकांच्या मनातील चित्र बदलणारे काम करण्याचा आपण आगामी नववर्षाचा संकल्प करुया असे आवाहन आयुक्तांनी केले.

कोव्हीड काळात ‘मिशन ब्रेक द चेन’ हाती घेऊन आवश्यक त्या सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात आला. आयुक्तपदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर दोनच दिवसांत जलद अहवाल मिळणार्‍या अँटीजेन टेस्टींग सुरु करण्यात आल्या. 11 दिवसांत महानगरपालिकेची स्वत:ची अत्यंत अदययावत सर्वोत्कृष्ट सुविधा असलेली आरटी-पीसीआर लॅब सुरु करण्यात आली. नुकतेच या लॅबने एक लाख टेस्टींग पूर्ण केल्या असून यामुळे महानगरपालिकेची स्वत:ची मौल्यवान आरोग्य सुविधा तयार झाली आहे. तसेच आठ ते दहा कोटी रकमेची बचत झालेली असल्याचे त्यांनी सांगितले. कोव्हीडच्या संकटाचा सामना करताना महानगरपालिकेने प्रचंड प्रयत्न केले. वेळ काळाचे भान न ठेवता कोरोना प्रतिबंधाचे उद्दीष्ट नजरेसमोर ठेवून ही लढाई लढली. यामध्ये नागरिकांचीही चांगली साथ लाभली याचा विशेष उल्लेख त्यांनी केला. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्यानंतर वाशी येथील सार्वजनिक रूग्णालय नागरिकांच्या आरोग्यसेवेसाठी पूर्ववत नॉन कोव्हीड करण्यात आले तसेच नेरूळ व ऐरोली रूग्णालयात मेडिकल व आयसीयू वॉर्ड सुरू करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. नवे वर्ष सुरु झाले म्हणजे फक्त कॅलेंडर बदलले, विषाणू तोच आहे. त्यामुळे स्वत:चे व कुटुंबाचे कोरोनापासून रक्षण करण्यासाठी सुरक्षा नियमांचे पालन करा असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले. याप्रसंगी प्रत्यक्ष स्वच्छता कार्यात दैनंदिन योगदान देणार्‍या पुरुष व महिला स्वच्छता दूतांचा आयुक्तांच्या हस्ते कृतज्ञता सन्मान करण्यात आला. आरंभ क्रिएशनच्या कलावंतांनी सादर केलेल्या स्वच्छताविषयक प्रबोधनपर लोकसंगीतमय पथनाटयाला कौतुकाची दाद मिळाली. यावेळी वसुंधरा अभियानात सहभागी होण्याची सामुहिक शपथ अधिकारी, कर्मचारी यांनी आयुक्तांसमवेत ग्रहण केली.