खांदेश्वर येथील गृह प्रकल्पालाही विरोध

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील मोकळ्या सार्वजनिक जागांवर पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरे बांधण्यास ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांनी विरोध दर्शविला आहे. आता खांदेश्‍वर रेल्वे स्थानकासमोरील मोकळ्या भूखंडावर सिडको बांधत असलेल्या पंतप्रधान आवास योजनेतील गृहप्रकल्पाला राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पाटील यांनी विरोध केला आहे. स्थानकासमोरील जागेत गृहप्रकल्प झाल्यास स्थानकाचा श्वास कोंडेल. शिवाय भविष्यात पार्किंग, वाहतूक कोंडी, पाणीप्रश्न आदी समस्या उद्भवतील अशी भूमिका त्यांनी या प्रकल्पाला विरोध करताना मांडली. 

प्रशांत पाटील यांनी आज (4 जानेवारी) प्रस्तावित प्रकल्पाच्या नियोजित जागेची पाहणी केली. यावेळी सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि नागरिकांशी चर्चा करून त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यांनतर त्यांनी ही भूमिका मांडली. खांदेश्वर रेल्वे स्थानकासमोरील मोकळ्या भूखंडावर सिडको पंतप्रधान आवास योजना राबवत आहे. येथे अल्प उत्पादन गटातील नागरिकांकरीता घरे बांधली जाणार आहेत. परंतु सध्या या जागेवर बस टर्मिनल, रेल्वे प्रवाशांसाठी वाहनतळाची सोय आहे. येथे पंतप्रधान आवास योजने अंतर्गत सिडकोतर्फे घरं बांधण्यात येणार आहेत. सकाळ-संध्याकाळी याठिकाणी नागरिक फेरफटका मारण्यासाठी येतात. स्थानकासमोरील जागेत गृहप्रकल्प झाल्यास स्थानकाचा श्वास कोंडेल. शिवाय भविष्यात पार्किंग, वाहतूक कोंडी, पाणीप्रश्न आदी समस्या उद्भवतील असे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे.

सिडकोच्या या योजनेच्या विरोधात नागरी हक्क समिती स्थापन करण्यात आली आहे. सिटीजन युनिटी फोरम, एकता सामाजिक सेवा संस्था या संस्थेसारख्या अनेक सामाजिक संस्था पुढे आल्या आहेत. या सामाजिक संस्थांकडून सिडकोच्या या प्रकल्पाला विरोध केला जात आहे. याआधी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने प्रकल्पविरोधी आंदोलनामध्ये पुढाकार घेतला होता. या पक्षांनी खांदेश्वर रेल्वे स्थानक परिसरातील गृहप्रकल्पाला विरोध म्हणून आंदोलन केले होते. परंतु आंदोलन करूनसुद्धा सिडकोने प्रकल्पाचे काम सुरु केले आहे. आमदार गणेश नाईक यांनीसुद्धा नवी मुंबईत होत असलेल्या पंतप्रधान आवास योजनेला विरोध केला आहे. दरम्यान, आगामी काळात सरकार या प्रकल्पावरुन काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.