सन्मान ‘सावित्रीच्या लेकींचा’

नवी मुंबई ः क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व महीला शिक्षक दिनाचे औचित्य साधून तुर्भेगाव येथे 3 जानेवारी रोजी ‘सावित्रीच्या लेकी’ या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. माजी नगरसेवक चंद्रकांत पाटील यांनी आयोजित केलेल्या या सोहळ्यात निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ व विभागातील महिला शिक्षकांना सन्मानित करण्यात आले.

आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जयंती दिन 3 जानेवारी हा ‘महिला शिक्षक दिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्ताने भाषण, एकांकिका, निबंध, परिसंवाद, वकृत्व स्पर्धेंचे आयोजन करण्यात येते. माजी नगरसेवक चंद्रकांत रामदास पाटील यांच्यावतीने तुर्भेगाव येथेही पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी सावित्रीबाई फुले आणि सार्वत्रिक शिक्षण, स्त्री-पुरुष समानता आणि सावित्रीबाई फुले यांचे विचार, पहिल्या भारतीय स्त्रीवादी विचारवंत:सावित्रीबाई फुले हे विषय देण्यात आले होते. या स्पर्धेला उत्कृष्ठ प्रतिसाद मिळाला. प्रथम पारितोषिक 5000 रु व सन्मानचिन्ह, द्वितीय पारितोषक  रु 2500 व सन्मानचिन्ह, तृतीय पारितोषिक  रु 1500 व सन्मानचिन्ह व सहभागी स्पर्धेकास बक्षिस असे बक्षिसाचे स्वरुप होते. या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ व महिला शिक्षकांचा सन्मान सोहळा 3 जानेवारी रोजी दिमाखात पार पडला. यावेळी विभागातील महिला शिक्षकांना ‘सावित्रीच्या लेकी’ या सन्मानाने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी विभागातील सर्व कार्यकर्ते, शिक्षक आणि विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते.