शेतकरी, व्यापार्‍यांना येणार्‍या अडचणी अधिवेशनात मांडणार

आमदार रोहित पवार यांची ग्वाही ; एपीएमसीला पहाटे दिली भेट

नवी मुंबई : शेतकर्‍यांना आणि व्यापार्‍यांना एपीएमसीमध्ये येणार्‍या अडचणी येत्या अधिवेशनात मांडणार असून व्यापारी, माथाडी कामगार, वाहतुकदार, मापाडी, सुरक्षा रक्षक यांच्या समस्या जाणुन घेऊन शासन दरबारी त्या सोडवण्यासाठी माझ्याकडुन निश्चितपणे प्रयत्न केले जातील असशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी दिली. मंगळवारी पहाटे 4 वाजता त्यांनी एपीएमसी मार्केटला भेट दिली त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामाचा धडाका संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. कामाची पाहणी असो वा उद्घाटन, अजितदादा न चुकता वेळेवर पोहोचतात. अजित पवारांच्या कामाची पद्धत त्यांचा पुतण्याही फॉलो करताना दिसत आहे. राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनीही भल्या पहाटे नवी मुंबई एमपीएमसी मार्केट गाठले. रोहित पवारांनी ठिकठिकाणी थांबून व्यापारी आणि शेतकर्‍यांची विचारपूस केली. शेतकर्‍यांना आणि व्यापार्‍यांना एपीएमसीमध्ये येणार्‍या अडचणी येत्या अधिवेशनात मांडणार, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. तसेच राष्ट्रवादी वाहतुक काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणिस या माझ्या पदात्मक जबाबदारीला अनुसरुन मी Aएपीएमसी मार्केट मधिल वाहतुकदारांच्या वाहन पार्किंगच्या समस्यांची माहिती त्यांना देऊन ट्रक टर्मिनल कायम ठेवण्याची आग्रहपुर्वक मागणी केली. त्याचबरोबर व्यापारी, माथाडी कामगार,वाहतुकदार, मापाडी,सुरक्षा रक्षक यांच्या समस्या जाणुन घेऊन शासन दरबारी त्या सोडवण्यासाठी माझ्याकडुन निश्चितपणे प्रयत्न केले जातील असे सांगितले.

भाजप सक्तवसुली संचलनालयाचा वापर करुन विरोधकांना लक्ष्य करत आहे. कदाचित उद्या मलाही ईडीची नोटीस येऊ शकते, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केले. त्यांनी ईडीकडून राजकीय नेत्यांना पाठवण्यात येणार्‍या नोटिसांविषयी शंका उपस्थित केली. हा राजकीय विरोधकांना लक्ष्य करण्याचा प्रकार असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. तसेच दिल्ली शेतकरी आंदोलनाबाबत भाजपची भुमिका हुकुमशाहीची असल्याचे रोहित पवार म्हणाले. महानगरपालिकांमध्ये महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र लढू शकतात. पण तशा वाटाघाटी आणि समीकरणे जुळून आली पाहिजेत. पदवीधर आणि विधान परिषद निवडणुकीत एकत्रित ताकद मोठी असल्याचे दिसून आले. त्यामुळे आगामी काळातही भाजपाच्या विचारधारेला रोखण्यासाठी महाविकास आघाडी एकत्रित लढेल. पण शेवटी हा निर्णय तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते घेतील, असे रोहित पवार यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासमवेत आमदार देवेंद्र भुयार बाजार समिती सभापती अशोक वाळुंज, माथाडी कामगार नेते शशिकांतजी शिंदे, युवा नेते तेजस शिंदे, माजी नगरसेवक राजुभैय्या शिंदे, बाजार समिती संचालक संजयशेठ पानसरे, शंकरशेठ पिंगळे, बाळासाहेब सोळस्कर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.