जलतरणपटू शुभम वनमाळीचा नवा विक्रम

पंधरा किलोमीटरचे अंतर 3 तास 13 मिनिटांत केले पार

नवी मुंबई ः अनेक जागतिक तसेच आशियाई विक्रम नावावर केलेल्या नेरुळचा जलतरणपटू शुभम वनमाळी याने आपल्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला आहे. राजभवन (गव्हर्नर बंगला), वाळकेश्वर ते गेटवे ऑफ इंडिया हे पंधरा किलोमीटरचे अंतर तीन तास तेरा मिनिटांमध्ये 30 डिसेंबर 2020 रोजी पोहून पार केले. 

मार्च महिन्यापासून नोव्हेंबर महिन्यापर्यंत कोवीड-19 या महामारीमुळे सर्व जलतरणतलाव बंद असल्यामुळे या काळामध्ये कोणत्याही प्रकारचा सराव होऊ शकला नव्हता. परंतु मागील फक्त 20 ते 25 दिवस सराव करून हे शिवधनुष्य त्याने पेललं. या स्विमची सुरुवात सायंकाळी 03.56 ला केली आणि सांगता 07.09 ला केली. या स्विमच्या निरीक्षक म्हणून महाराष्ट्र स्विमिंग असोसिएशनने आंतरराष्ट्रीय ओपन वॉटर जलतरणपटू रूपाली रेपाळे यांची नेमणूक केली होती.

आंतरराष्ट्रीय ओपन वॉटर  जलतरणपटु आणि शिवछत्रपती अवॉर्ड विजेता शुभम माळी याने यापूर्वी जगभरातील इंग्लिश खाडी, जिब्राल्टरची सामुद्रधुनी यासारख्या अनेक खाड्या पोहून पार केलेल्या आहेत. तसेच अनेक जागतिक तसेच आशियाई विक्रम त्याच्या नावावर आहेत. खूपच कमी सराव करून आणि खुपचं कमी वेळेमध्ये हे अंतर पार केल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.