देवगड हापूसचे एपीएमसीत आगमन

नवी मुंबई : सर्वसाधारपणे थंडीचा मोसम कोकणातील हापूस आंब्यांना मोहर लागण्याचा काळ म्हणून ओळखला जातो, मात्र मागील काही वर्षांपासून जानेवारीत काही गावांतून मुंबई व पुण्यातील घाऊक बाजारपेठेत तयार हापूस आंबा पाठविला जात आहे. बुधवारी देवगडमधील कुणकेश्वर गावातील शंकर नाणेरकर यांच्या बागेतील दहा डझनाच्या हापूस आंब्याच्या दोन पेटया तुर्भे येथील व्यापारी अविनाश पानसरे यांच्याकडे आल्या आहेत.

या हापूस आंब्याचा दर अद्याप निश्चित झालेला नाही, पण जानेवारी महिन्यात येणार्‍या नवसाच्या पहिल्या पेटीचा दर सर्वसाधारपणे सात ते आठ हजार रुपये पेटी आकारला जात असल्याचा अनुभव आहे. कोकणातील हापूस आंब्याच्या बागांना यंदा चक्रीवादळाचा फटका बसलेला आहे. त्यामुळे समुद्रकिनार्‍यांच्या अनेक बागा उद्ध्वस्त झालेल्या आहेत. बुधवारी हापूस आंब्याची पहिली पेटी घाऊक बाजारात दाखल होत असतानाच सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने हजेरी लावलेली आहे. त्यामुळे यंदा कोकणातील हापूस आंबा बागायतदार चिंताग्रस्त आहेत. गेल्या वर्षी ऐन हापूस आंबा मोसमात करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने बागायतदारांची मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. त्या स्थितीही काही बागायतदारांनी थेट हापूस आंबा किरकोळ बाजारात आणून विकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हे नुकसान काही प्रमाणात कमी झाले होते. या आर्थिक संकटात कोकणातील हापूस आंबा बागायतदार असताना यंदा चांगल्या उत्पन्नाची आशा करीत आहे. त्याच वेळी कोकणातील प्रसिद्ध देवगड तालुक्यातील कुणकेश्वर या गावातून पहिली पेटी बुधवारी तुर्भे येथील एमपीएमसी बाजारात आली असून कच्चा असलेला हा हापूस आंबा येत्या दहा ते बारा दिवसांत पिकणार आहे.