आवक वाढल्याने फळांच्या दरात घसरण

नवी मुंबई : नवी मुंबई एपीएमसी फळ मार्केटमध्ये 280-300 गाड्यांची आवक होत असून फळांच्या दरात घसरण झाली आहे. ग्राहक नसल्याने मालाला उठाव नाही. बाजारात संत्रीच्या आवक वाढली असून संत्री 5000 क्विंटल, सफरचंद 1000 क्विंटल, कलिंगड 3000 क्विंटल ,अननस 1200 क्विंटल, द्राक्ष 450 क्विंटल दाखल झाली आहे. 

फळमार्केटमध्ये सफरचंद 80 ते 90 रुपये, डाळिंब 75 ते 150 रुपये, संत्री 20 ते 25, द्राक्ष 60 ते 80 रुपये ,अननस 24 ते 30 रुपये ,पपई 14 ते 16 रुपये, कलिंगड 5 ते 7 रुपये, अंजीर 60 ते 75 रुपये, चिकू 20 ते 25 प्रतिकिलोने विकली जात आहेत. मार्गशीर्ष महिन्यापासून फळांची आवक जास्त असते आणि ग्राहकांची वर्दळ देखील जास्त असते. मात्र सध्या बाजार आवारात आवक वाढल्याने फळांच्या दरात घसरण झाली आहे. अतिवृष्टीमुळे बर्‍याच पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. त्यामुळे फळांच्या किंमतींनी सणासुदीच्या काळात आसमान गाठले होते. मात्र आता फळांच्या किंमतीत घसरण झाली आहे. बाजार आवारात संत्र्याच्या आवक जास्त झाल्याने पूर्ण मार्केटमध्ये संत्री दिसून येत आहे. संत्र्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली असून 20 ते 25 रुपये किलोदराने विकला जात आहे. तसेच 130 रुपये किलो दराने विकला जाणारा सफरचंद सध्या बाजारात 60 ते 70 रुपये दराने विकला जात आहे. डाळिंब 70 ते 150 रुपये, अननस 20 ते 30 रुपये , द्राक्ष 60 ते 80 रुपये, कलिंगड 5 ते 8 रुपये, पपई 10 ते 15 रुपये किलोने विकली जात आहे.

व्यापार्‍याने बाचतित केल्यानंतर त्यांनी सांगितलं की, शेतकर्‍यांच्या आंदोलनमुळे दिल्ली आणि पंजाबमध्ये जाणारं संत्री बंद झालं आहे. त्यामुळे मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये आवक वाढली आहे. दर पडले असल्याने आता सर्वसामान्य नागरिक देखील सफरचंद आणि संत्राची चव घेऊ शकतात. मात्र किरकोळ बाजारामध्ये कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्याने फळांचे भाव वाढून ते विकले जात आहेत. त्यामुळे दरवाढीचा सामना सर्वसामान्यांना करावा लागणार आहे.

भाज्यांच्या दरात घसरण

वाशीतील एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाल्याची आवक वाढली आहे. त्यामुळे भाज्यांचे दर गडगडले आहेत. बहुतांश भाज्या या 20 ते 25 रुपये किलोच्या घरात आल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना आता ताज्या भाज्या स्वस्त दरात मिळणार आहेत. सध्या भाज्याची निर्यात होत नसल्याने भाज्यांच्या दरात घट झाली आहे. त्याउलट हिवाळ्यात भाज्यांची आवक वाढते. सध्या मार्केटमध्ये 600 भाजीपाल्यांच्या गाड्या येत आहेत. त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात माल पडून आहे. त्यामुळे भाजीवाले अगदी कमी दरात हा भाजीपाला विकत आहेत. परिणामी घाऊक भाजीपाला बाजारातील दर कमी झाले आहेत.