शहर सुशोभिकरणाकडे विशेष लक्ष

बेवारस वाहने, अनधिकृत बॅनर्स हटविण्याची धडकमोहीम

नवी मुंबई ः स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये देशात पहिले येण्याचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून वाटचाल करीत असताना स्वच्छतेप्रमाणेच आकर्षक रंगसंगतीने सजलेल्या भिंती, उड्डाणपूल, विद्युत रोषणाई, शिल्पाकृती, कारंजी अशा विविध माध्यमांतून नवी मुंबई शहर सुशोभिकरणाकडे विशेष लक्ष दिले जात आहे.

 अशा विविध गोष्टींमुळे नवी मुंबईचे रूप बदलत असताना शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांवर बरेच दिवस धूळ खात उभी असलेली वाहने यामुळे स्वच्छता कार्यात अडथळा निर्माण होताना दिसत आहे. त्याचप्रमाणे ठिकठिकाणी अनधिकृतरित्या लागलेल्या बॅनर्स, होर्डींगमुळेही शहर विद्रुपीकरण होत आहे. या बाबींकडे गांभीर्याने बघत ठोस कारवाई करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी कालच्या बैठकीत दिले होते. त्यास अनुसरून आज सर्वच विभागांमध्ये बेवारस वाहने हटविणे व अनधिकृत बॅनर्स काढण्याची धडक मोहीम हाती घेण्यात आली.

शहर स्वच्छतेमध्ये स्वच्छताप्रेमी नागरिकांचे संपूर्ण योगदान अपेक्षित आहे. शहर स्वच्छता व सुशोभिकरणाला बाधा पोहचविणार्‍या अशा बाबींवर महानगरपालिकेमार्फत कारवाई करण्यात येत असून नागरिकांनी याकामी सहकार्य करणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने होर्डींग उभारावयाचे असल्यास संबंधित विभाग कार्यालयांतून रितसर परवानगी घेऊनच उभारावेत तसेच सार्वजनिक ठिकाणी कोठेही स्टिकर्स, पोस्टर्स चिटकवून शहर विद्रुप करू नये. त्याचप्रमाणे  वाहने रस्त्यांवर उभी असल्यास ती योग्य जागी पार्क करावीत आणि आपल्या नवी मुंबई शहराच्या स्वच्छ व सुंदर निर्मितीत आपले सक्रीय योगदान द्यावे असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.