फोडाफोडीसाठी भाजप नगरसेवकांवर पोलिसांचा दबाव फोटो

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा आरोप

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वीच फोडाफोडीचं राजकारण सुरू झालं आहे. भाजपच्या नगरसेवकांविरोधात पोलीस बळाचा वापर करण्यात येत आहे, असा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. पोलिसांनी सरकारच्या दबावाखाली काम करू नये, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. 

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली. यावेळी त्यांनी नवी मुंबईत भाजप नगरसेवकांवर दहशत निर्माण केली जात असल्याचं सांगितलं. महापालिका निवडणुकीपूर्वीच शहरात फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे. पोलीस बळाचा वापर करून नगरसेवकांवर दबाव आणला जात आहे. त्यांच्या जुन्या केसेस उकरून काढून त्यांना त्रास दिला जात आहे. साम, दाम, दंड आणि भेदाचा वापर केला जात असल्याचं दरेकर यांनी पोलीस आयुक्तांना सांगितलं. दिघा यादव नगर येथील भाजपाचे नगरसेवक राम आशिष यादव यांच्यामागे पोलीस यंत्रणा लागली असून त्यांच्यावर विविध प्रकारचा दबाव पक्षांतरासाठी आणला जातो आहे. गेल्या पंधरा दिवसापासून यादव यांच्यावरील दबाव वाढला असून त्यांच्यावर हल्ला होण्याची भीती देखील निर्माण झालेली आहे. यादव यांचे काही बरेवाईट होण्याअगोदर त्यांना पोलिस संरक्षण देण्याची मागणी विरोधी पक्षनेते दरेकर यांनी पोलिस आयुक्तांकडे केली आहे. दहशतीचा वापर करून भाजपाचे काही नगरसेवक फोडले तरी भाजपा काही कमजोर होणार नाही असे स्पष्ट करून पोलिसांकरवी भाजपा नगरसेवकांवर आणला जाणार दबाव  थांबला नाही तर मात्र भाजपच्या वतीने उग्र आंदोलन पुकारल जाईल, असा इशारा विरोधी पक्षनेते दरेकर यांनी दिला आहे.

शहरात भयाचं वातावरण आहे. येथील वातावरण गढूळ झालं आहे. नगरसेवक आणि नागरिकांमध्ये भय निर्माण होऊ नये ही पोलिसांची जबाबदारी आहे. त्यानुषंगाने पोलिसांनी पावलं उचलवीत, असं सांगतानाच पोलिसांनी दुटप्पी भूमिका घेऊ नये. सरकारच्या दबावाखाली काम करू नये, असं आवाहनही त्यांनी पोलिसांना केलं.