गांवठाण व झोपडपट्टीतील स्वच्छतेची आयुक्तांकडून पाहणी

शौचालयांच्या स्वच्छतेकडे अधिक काटेकोर लक्ष देण्याचे निर्देश

नवी मुंबई ः‘स्वच्छ सर्वेक्षण 2021’ अंतर्गत शहर स्वच्छता व सुशोभिकरण कामाला गती आलेली असून महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिघा व ऐरोली विभाग क्षेत्रामधील गांवठाणे, झोपडपट्टी भागाला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. दिघा व दिवा गाव तसेच दिघा भागातील झोपडपट्टी क्षेत्रात गल्ल्यांमधील अंतर्गत स्वच्छता, कचरा वर्गीकरण, सुशोभकरण बाबींची त्यांनी पाहणी केली.

ठाणे बेलापूर मुख्य रस्त्यालगत असणार्‍या दिघा तलावाची स्वच्छता व सुशोभिकरण करण्यात आले असून त्यामध्ये नागरिकांकडून कचरा टाकला जाऊन अस्वच्छता होऊ नये याकरिता दिघा तलावाच्या काठावर चोहोबाजूने बसविण्यात आलेल्या ग्रीलवर तारेच्या जाळीचे कुंपण लावावे असे आयुक्तांनी सूचित केले. दिघ्यातील रामनगर नाक्यावरील तसेच दिघा बाबा मंदिराजवळील सार्वजनिक शौचालयाची पाहणी करताना तेथील स्वच्छतेत वाढ करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. ऐरोली विभागात दिवा गावातील दोन शौचालयांची पाहणी करताना पुरेशी स्वच्छता आढळून न आल्याने तीव्र नाराजी व्यक्त करीत आयुक्तांनी तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले. विशेषत्वाने झोपडपट्टी व गावठाण भागातील सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असल्याने तेथील केअर टेकर कितीदा साफसफाई करतो यापेक्षा ते नेहमी साफ असणे गरजेचे आहे असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी दिले. महापालिका क्षेत्रातील सर्वच शौचालयात स्वच्छता राखण्याची काटेकोर कार्यवाही करण्यात यावी असे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांना आयुक्तांनी आदेशित केले.

दिघा भागातील नाल्यांची पाहणी करताना इतर विभागांमध्ये नाल्यांमध्ये कचरा टाकला जाऊ नये म्हणून ज्याप्रकारे उंच जाळ्या बसविण्यात आलेल्या आहेत तशाप्रकारच्या जाळ्या तेथेही बसवून घ्याव्यात असे आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले. जापनीज् झेन संकल्पनेवर आधारीत विशेष उद्यान सेक्टर 5, ऐरोली येथे विकसित करण्यात आले असून त्यामध्ये असलेली शिल्पे, प्रतिकृती, चिन्हे यांची झेन संकल्पनेनुसार माहिती देणारे फलक नागरिकांना झेन संकल्पनेची माहिती मिळावी यादृष्टीने प्रदर्शित करण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या.

स्वच्छता ही नियमितपणे करण्याची गोष्ट असून ‘झिरो गार्बेज ऑन रोड’ याप्रमाणेच शौचालयांच्या स्वच्छतेकडे काटेकोर लक्ष देण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या. सद्यस्थितीत शौचालयांची स्वच्छता 3 वेळा केली जात असून ती कितीदा स्वच्छता केली यापेक्षा शौचालये नियमित स्वच्छ राहण्यासाठी आवश्यक तेवढ्या वेळा स्वच्छता केली पाहिजे अशा स्पष्ट सूचना आयुक्तांनी दिल्या.