नवी मुंबईसाठी 21 हजार कोव्हीड लस

कोव्हीड लसीकरण प्रक्रियेचा आयुक्तांनी घेतला आढावा

नवी मुंबई ः नवी मुंबई महानगरपालिकेस 21 हजार कोव्हीड लस प्राप्त झाल्या आहेत. यासाठी 50 लसीकरण केंद्रांचे नियोजन केलेले आहे. 16 जानेवारीपासून संपूर्ण देशात कोव्हीड 19 लसीकरण सुरु होणार असून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील लसीकरणाबाबतच्या नियोजनाचा सविस्तर आढावा गुरुवारी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी घेतला. 

यापूर्वीच्या आढावा बैठकीत आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार कोव्हीड 19 लसीकरण मोहिमेवर नियंत्रण ठेवण्यासाठी मुख्यालय स्तरावर अपघात वैद्यकीय अधिकारी डॉ. रत्नप्रभा चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आलेली असून महानगरपालिका क्षेत्रातील लसीकरणासाठी विभागनिहाय 3 विभागीय नोडल ऑफिसर नेमण्यात आलेले आहेत. हे विभागीय नोडल ऑफिसर आपापल्या विभागातील केंद्रांवर करण्यात येणार्‍या लसीकरण कार्यक्रमाचे नियंत्रण करणार आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेने सध्याच्या शासकिय सुचनांनुसार 50 लसीकरण केंद्रांचे नियोजन केलेले असून त्याठिकाणी आवश्यक अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती केलेली आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात 16 जानेवारीपासून कोव्हीड काळात आरोग्य विषयक सेवा देणार्‍या शासकीय व खाजगी आरोग्यकर्मी कोव्हीड योध्यांना लसीकरण केले जाणार असून 19 हजार 85 कोव्हीड योध्यांची नोंद महानगरपालिकेकडे झालेली आहे. लसीकरण करताना कोविन अ‍ॅपवर नोंदणी झालेल्या क्रमानेच लसीकरण करण्यात यावे आणि लसीकरण झाल्यानंतर व्यक्ती निरीक्षण कक्षात बसल्यानंतर त्यांच्याकडे 4 महत्वपूर्ण संदेशाचे हँडबिल देण्यात यावे असेही आयुक्तांनी सूचित केले.

लसीकरणाच्या दुसर्‍या टप्प्यात पोलीस, सुरक्षा, स्वच्छता व कोव्हीड नियंत्रक कार्यवाहीत सहभागी असलेले इतर महानगरपालिका कर्मचारी अशा प्रत्यक्ष कृतिशील असणार्‍या फ्रन्टलाईन कर्मचार्‍यांना लसीकरण करण्यात येणार आहे. लसीची कोल्डचेन साठवणूकीच्या टप्प्यापासून वितरण होईपर्यंत व उरलेल्या लस परत घेऊन त्याचीही साठवणूक करण्याची कार्यवाही काटेकोरपणे व्हावी असे आदेश दिले. यामध्ये प्रत्येक टप्प्यावरील जबाबदारी निश्चित करावी व यामध्ये कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा चालणार नाही असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. 16 जानेवारी रोजी होणार्‍या कोव्हीड 19 लसीकरणासाठी महानगरपालिकेची वाशी व ऐरोली ही 2 सार्वजनिक रुग्णालये तसेच नेरूळ येथील डॉ. डि.वाय.पाटील हॉस्पिटल, सी.बी.डी. बेलापूर येथील अपोलो हॉस्पिटल तसेच खैरणे एम.आय.डी.सी. येथील रिलायन्स हॉस्पिटल अशी 5 लसीकरण आरंभ केंद्रें  निश्चित करण्यात आलेली आहेत. कोविन पवर नोंदणी झालेल्या आरोग्यकर्मींना त्यांचे लसीकरण कोणत्या केंद्रावर, कोणत्या तारखेला व वेळेत होणार आहे याचा संदेश मोबईलवर प्राप्त होणार असून प्रत्येक केंद्रावर दर दिवशी 100 व्यक्तींना लसीकरण केले जाणार आहे.