किरकोळ वादातून महिलेची आत्महत्या

नवी मुंबई : प्रियकरासोबत झालेल्या किरकोळ वादातून एका विवाहित महिलेने रहात्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री वाशीतील कोपरी गावात घडली. एपीएमसी पोलिसांनी या प्रकरणी अपमृत्यूची नोंद करुन पुढील तपास सुरु केला आहे.  

या घटनेतील मृत महिलेचे नाव योगीता वाडवल (32) असे असून ती कोपरी गावात  6 वर्षाच्या मुलासोबत राहात होती. योगीताचे मागील काही महिन्यापासून त्याच भागातील राजकुमार हरिजन (29) याच्या सोबत प्रेमसंबध जुळले होते. त्यामुळे राजकुमार हा योगीतासोबत राहात होता. दरम्यान, योगीताचे दुसर्‍या व्यक्तीसोबत अनैतिक संबध असल्याचा राजकुमारला संशय होता. याच कारणावरुन मंगळवारी रात्री योगीता आणि राजकुमार या दोघांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर राजकुमार घरातून निघून गेला असताना, योगीताने आपल्या मुलाला झोपवून घरातील पंख्याला गळफास घेतला. 

दरम्यान, पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास राजकुमार योगीताच्या घरी परतल्यानंतर ती घरामध्ये गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आली. त्यामुळे त्याने योगीताला महापालिकेच्या रुग्णालयात नेले. मात्र तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. याप्रकरणी अपमृत्यूची नोंद करण्यात येऊन पुढील तपास सुरु असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी काठे यांनी दिली.