नवी मुंबईत नायलॉन मांजावर बंदी

पोलीस उपायुक्तांचे मनाई आदेश जारी 

नवी मुंबई : मकर सक्रांती सणानिमित्त पतंग उडविण्याला महत्व आहे. पण, अलिकडच्या काळात पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणार्‍या प्लास्टीक अथवा नायलॉनच्या मांजामुळे (धागा) पक्षी आणि माणसांच्या प्राणांतिक अपघाताच्या घटना घडलेल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत अशा नायलॉन मांजावर महिनाभरासाठी बंदी घालण्यात आली आहे. त्यानुसार नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत 14 जानेवारी रोजी रात्री 12 ते 12 फेब्रुवारी 2021 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत नायलॉन मांजाची विक्री, साठवणूक आणि त्याच्या वापराला बंदी घालण्याचे आदेश विशेष शाखेच्या पोलीस उपआयुक्त रुपाली अंबुरे यांनी दिले आहेत. 

मकर संक्रांती सणानिमित्त सर्वत्र पतंग महोत्सव साजरा केला जातो. यावेळी उडविल्या जाणार्‍या पतंगाचा मांजा मात्र प्लास्टिक किंवा अशाच प्रकारच्या सिंथेटिक साहित्याने बनविलेला असतो. या नायलॉन मांजामुळे माणसांना आणि पक्ष्यांना इजा होऊन त्यात काही माणसे आणि पक्ष्यांचा जीवघेणा मृत्यू झालेला आहे. याशिवाय नायलॉन मांजा उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांमध्ये अडकून वीज खंडीत होणे, वीज वाहक तारा तुटण्याचे प्रकार देखील घडलेले आहेत. त्यामुळे या फ्लास्टीक अथवा नायलॉन मांजाला सर्वत्र बंदी घालण्याची मागणी देखील झालेली आहे. 

 त्याअनुषंगाने संभाव्य धोका बघता नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात 14 जानेवारी पासून 12 फेब्रुवारी रोजी रात्री 12 पर्यंत नायलॉन मांजाच्या (प्लास्टीक धागा) वापरास, विक्रीला  आणि त्याच्या साठवणुकीला पूर्णपणे बंदी घालण्यात आली असल्याचे पोलीस उपआयुक्त रुपाली अंबुरे यांनी सांगितले. यासंदर्भात नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत सीआरपीसी कलम 144 अन्वये आदेश जारी करण्यात आले असून या आदेशाचे उल्लंघन करणाऱयांवर आयपीसी कलम 188 अन्वये कारवाई करण्याचा इशारा पोलीस उपायुक्त अंबुरे यांनी दिला आहे.