कोव्हीड लसीसाठी ज्येष्ठ नागरिकांची नावनोंदणी मोहीम

शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांचा उपक्रम

नवी मुंबई ः शिवसेनेच्या माध्यमातून शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांनी ज्येष्ठ नागरिकांना कोव्हीड 19 प्रतिबंध लसीचा लाभ मिळण्यासाठी त्यांच्या नावनोंदणी मोहिमेचा प्रारंभ केला आहे.

मार्च 2020 पासून जनता कोव्हीड 19 च्या प्रादुर्भावाने ग्रासलेली आहे. कोव्हीड 19 चा प्रादुर्भाव कमी होत नाही तोच कोव्हीडच्या नव्या स्वरूपातील रूपाने ब्रिटन, फ्रांस अमेरिका या देशांमध्ये उग्र रूप धारण केलेले आहे. भारतातील जनतेला कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून भारत सरकारच्या वतीने कोव्हीड 19 प्रतिबंधक लस उपलब्ध केली आहे, ही लस सर्वात आधी आरोग्य कर्मचारी, पोलीस, शिक्षक अश्या टप्प्याटप्प्याने मग ज्येष्ठ नागरिक आणि इतरांना उपलब्ध केली जाणार आहे. त्या अनुषंगाने आपल्या प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांची लस घेताना कोणत्याही प्रकारची हेळसांड व दिरंगाई होऊ नये म्हणून शिवसेना उपजिल्हा प्रमुख माजी नगरसेवक किशोर पाटकर यांनी प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांच्या नाव नोंदणीची मोहीम मकर संक्रांतीच्या दिवशी सुरू केली आहे .यात ज्येष्ठ नागरिकांचा आधारकार्ड क्रमांक, मोबाईल क्रमांक, पत्ता, त्यांना कोणता आजार आहे,कोणत्या औषधाची एलर्जी आहे याची माहिती संकलित करून ती महानगरपालिकेकडे  जमा केली जाणार आहे.पालिकेकडे ही माहिती आधीच नोंद असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना लस उपलब्ध करताना कोणतीही अडचण किंवा दिरंगाई होणार नाही अशी माहिती किशोर पाटकर यांनी यावेळी दिली,तसेच जास्तीतजास्त ज्येष्ठ नागरिकांनी आपली नावनोंदणी करावी असे आवाहन त्यांनी केले आहे.