सिडकोच्या तिजोरीत 56 कोटींची भर

निवासी, रो हाउस, बंगलो भूखंडांच्या विक्रीस उत्तम प्रतिसाद

नवी मुंबई ः सिडको महामंडळातर्फे ई-लिलाव व ई-निविदा प्रक्रियेद्वारे घणसोली आणि नवीन पनवेल येथील एकूण 27 निवासी, रो हाउस, बंगलो भूखंडांच्या विक्री च्या योजनेस निविदाकारांचा उत्तम प्रतिसाद लाभून योजना पुस्तिकेतील वेळापत्रकानुसार संपूर्ण प्रक्रिया पार पडून 15 जानेवारी 2021 रोजी सिडको भवन येथे प्राप्त झालेल्या ई-निविदा उघडण्यात आल्या व ई-लिलाव प्रक्रियेमधील बोलींची तुलना करण्यात येऊन यशस्वी निविदादारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. या भूखंड विक्रीतून सिडकोच्या तिजोरीत अंदाजे रू. 56 कोटींची भर पडली आहे.  

सदर योजने अंतर्गत सिडको महामंडळातर्फे डिसेंबर 2020 मध्ये नवी मुंबईतील विकसित नोड असलेल्या घणसोली येथील सेक्टर-4 मधील एकूण 12 भूखंड तर झपाट्याने विकसित होत असलेल्या नवीन पनवेल (पू.) नोड येथील सेक्टर-8ई, 9ई, 5ए(ई) आणि 12ई मधील एकूण 15 भूखंड विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात आले होते. सदर भूखंड हे निवासी, रो हाउस, बंगलो वापराकरिता उपलब्ध होते. सर्व भूखंडांकरिता 1.00 इतका चटई क्षेत्र निर्देशांक अनुज्ञेय आहे. ई-लिलाव व ई-निविदा प्रक्रिये अंतर्गत अर्ज नोंदणी, अनामत रकमेचा भरणा, निविदा भरणे या सर्व प्रक्रिया सुलभ, पारदर्शक व जलद अशा ऑनलाईन पद्धतीने  राबविण्यात आल्या. यामध्ये ऑनलाईन माध्यमातून बंद निविदा सादर केल्यानंतर अर्जदरांना पुढील टप्प्यातील ई-लिलाव प्रक्रियेमध्ये सहभागी होता येणार होते. 

बंद निविदेमध्ये उद्धृत करण्यात आलेली बोली किंवा ई-लिलावामध्ये उद्धृत करण्यात आलेली बोली यांपैकी जी बोली जास्त रकमेची असेल ती बोली स्वीकारण्याचा निकष निश्चित करण्यात आला होता. या भूखंड विक्री योजनांच्या माध्यमातून नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच सर्वसामान्य नागरीक व विकासकांना आपली स्वप्नं साकार करण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. भविष्यातदेखील अशा अनेक सुवर्णसंधी सिडकोतर्फे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असे प्रतिपादन सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी केले आहे.