नामांतरण वादाचा सेनेला फटका?

महापालिका निवडणूकीच्या तोंडावर विरोधकांना आयते कोलीत

नवी मुंबई ः औरंगाबाद महानगरपालिका व नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणुक तोंडावर आली असताना विरोधकांनी नामांतरणाचा मुद्दा उचलून धरल्याने शिवसेना बॅकफुटला गेल्याचे दिसत आहे. औरंगाबादचे नाव संभाजीनगर तर नवी मुंबई विमानतळाला स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे या मागणीला काँग्रेस व प्रकल्पग्रस्तांनी विरोध केल्याने येत्या महापालिका निवडणुकीत शिवसेनाला याचा फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

औरंगाबाद शहराचे नामांतरण संभाजीनगर करावे अशी अनेक वर्ष मागणी शिवसेनेने विरोधी पक्षात असताना केली होती. याचा फायदा शिवसेनेला औरंगाबाद महापालिका निवडणुकीत होऊन गेली अनेक वर्ष शिवसेनेचा भगवा या महापालिकेवर फडकत आहे. राज्यात यावेळी शिवसेनेने महाआघाडीसोबत सत्ता स्थापन केल्याने मनसे व भाजपाने औरंगाबाद शहराचे नामांतरण संभाजीनगर करावे अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे. या मागणीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी विरोध केल्याने विरोधकांना चांगलाच मुद्दा शिवसेनेविरुद्ध औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीत मिळाला आहे. या महापालिकेची निवडणुक मार्च महिन्यात होण्याची शक्यता वर्तविली जात असून मनसे व भाजप यांनी नामांतरणाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेला औरंगाबादमध्ये घेरण्यास सुरुवात केल्याने सेनेची चांगलीच गोची झाली आहे. या मागणीमुळे हिंदु मतांचे धु्रवीकरण झाल्यास त्याचा फायदा भाजपला होण्याची शक्यता राजकीय विश्‍लेषक वर्तवत आहेत. 

त्याचबरोबर नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई विमानतळाला स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी सरकारकडे केली आहे. या मागणी विरुद्ध स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी आपला विरोध नोंदवला असून या विमानतळाला स्व. दि.बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी केली आहे. दि.बा.पाटील हे प्रकल्पग्रस्तांचे नेते होते शिवाय त्यांनी प्रकल्पग्रस्तांसाठी साडे बारा टक्के भुखंड वाटप योजना, विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती यासारख्या योजना सरकारकडून मंजूर करुन घेतल्याने प्रत्येक प्रकल्पग्रस्तांच्या मनात त्यांना आदराचे स्थान आहे. त्यांच्या त्यागाचे व कार्याचे कायमस्वरुपी जतन व्हावे म्हणून प्रकल्पग्रस्तांनी सुरुवातीपासूनच विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी वेळोवेळी केली आहे. असे असताना एकनाथ शिंदे यांनी दि.बा. यांना डावलून बाळासाहेब ठाकरे यांचे नाव सूचवल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये संताप उसळला आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात दहा टक्के मते ही स्थानिक प्रकल्ग्रस्तांची असून शिवसेनेच्या या भुमिकेमुळे त्याचा फायदा निवडणुकीत गणेश नाईक यांना मिळण्याची शक्यता आहे. भाजपने या नामांतरणावरुनही शिवसेनेला नवी मुंबईत घेरण्याची सुरुवात केली असून गावोगावी त्यादृष्टीने बैठका घेण्यात येत आहेत. 

दोन्ही नामांतरणाचा वाद ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर आल्याने तसेच शिवसेनेला त्यांचे सत्तेतील सहकारी काँग्रेस पक्षाने नामांतरणास विरोध केल्याने शिवसेनेची गोची झाली आहे. शिवसेनेकडून याबाबत अजूनपर्यंत कोणतीही अधिकृत भुमिका जाहीर करण्यात आली नसली तरी विरोधकांनी त्याचे आतापासूनच राजकीय भांडवल करणे सुरु केल्याने त्याचा फटका शिवसेनेला बसण्याची शक्यता राजकीय समिक्षक वर्तवित आहेत. 

शिंदेंच्या भुमिकेने सेनेत संभ्रम 
नवी मुंबई विमानतळाच्या कामाला अजून सुरुवातही झाली नसताना नामांतरणाचा प्रश्‍न उपस्थित करण्यामागच्या त्यांच्या हेतूबाबत शिवसैनिकात संभ्रमाचे वातावरण आहे. 
नवी मुंबई महानगरपालिकेवर सेनेचा भगवा फडकल्यास नवी मुंबईतून शिवसेनेला नवीन नेतृत्व मिळेल आणि ठाण्याचे महत्व कमी होईल या भुमिकेतून त्यांनी हे नामांतरणाचे पिल्लू सोडल्याचे बोलले जात आहे. यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या मतांचे धु्रवीकरण होऊन त्याचा फायदा नाईकांना होईल अशी भुमिका नाथांची तर नाही ना अशी चर्चा शिवसैनिकांत आहे.
दि.बा.पाटील यांनी शेतकर्‍यांच्या पुनर्वसनासाठी दिलेला लढा हा फार मोठा आहे. त्यामुळेच शेतकर्‍यांना साडे बारा टक्के जमिनीचा मोबदला आणि प्रति एकरी वाढीव भाव मिळाला. त्यांनी 14 वर्ष अखंड सरकारशी लढा देऊन शेतकर्‍यांमध्ये मोठी जागृती निर्माण केली. दि.बा.पाटील हे आताच्या पुर्नवसन कायद्याचे प्रणेते असून त्यामुळे आज शेतकर्‍यांना बाजारभावाच्या पाच पट मोबदला मिळत आहे. त्यांचे हे कार्य व कर्तृत्व जगभर पोहचण्यासाठी त्यांचे नाव या विमानतळाला देणे गरजेचे आहे. कोणीही यात राजकारण आणू नये. 
- अ‍ॅड. सुरेश ठाकूर, अध्यक्ष, नवी मुंबई 95 गावे नैना प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती
  • या विमानतळाला हिंदुसदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोठे योगदान आहे. त्यामुळे अशा उत्तुंग नेत्याचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देणे म्हणजे त्या वास्तूचा गौरव करण्यासारखे आहे. असे  शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.