मेडिकल व आयसीयू वॉर्डचे लोकार्पण

नवी मुंबई ः महानगरपालिकेच्या नेरुळ व ऐरोली येथील रुग्णालयाच्या बरीच वर्ष पूर्ण क्षमतेने वापरात नसलेल्या 300 बेड्स क्षमतेच्या इमारतींमध्ये आयुक्त अभिजीत बांगर यांनी पुढाकार घेत मेडीकल व आयसीयू वॉर्ड्स सुरु करून आरोग्य सेवेचे सक्षमीकरण करण्यास सुरुवात केली असल्याचे सांगत कोव्हीडच्या जास्त प्रादुर्भावाच्या काळातही महानगरपालिकेने कोव्हीड रोखण्यासाठी अतिशय चांगले काम केले असल्याचे मत महाराष्ट्र राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी मंत्री महोदयांनी महानगरपालिकेच्या वतीने मेडीकल कॉलेज सुरु करण्याची प्रक्रीया कार्यान्वित करावी. त्यासाठी शासकीय पातळीवरील आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल असे आश्वासित केले.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ऐरोली येथील राजमाता जिजाऊ रुग्णालय व नेरुळ येथील माँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालय याठिकाणी पुरुष व महिलांकरिता स्वतंत्र 15-15 बेड्सच्या मेडिकल वॉर्डसचे तसेच 10 बेड्सच्या आयसीयू वॉर्डच्या लोकार्पण समारंभाप्रसंगी  त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी एकनाथ शिंदे यांच्या समवेत ठाणे लोकसभा सदस्य खासदार राजन विचारे, विधानपरिषद सदस्य आमदार रमेश पाटील, महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त संजय काकडे व सुजाता ढोले व इतर मान्यवर उपस्थित होते.

प्रिस्क्रिप्शन फ्री योजनेचा शुभारंभ
याप्रसंगी मंत्रीमहोदयांच्या हस्ते प्रिस्क्रिप्शन फ्री योजनेचा शुभारंभ संपन्न झाला. या योजनेअंतर्गत 1 फेब्रुवारी 2021 पासून नवी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचार घेणार्‍या रुग्णांना डॉक्टरांकडून औषध चिठ्ठी देण्यात येणार नसून सर्व प्रकारची औषधे नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत विनामूल्य दिली जाणार आहेत. ही प्रिस्क्रिप्शन फ्री योजना म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारी बाब असल्याचे  एकनाथ शिंदे विशेषत्वाने सांगितले. त्यांच्या शुभहस्ते रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षकांना प्रिस्क्रिप्शन फ्री योजनेचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. सध्या महानगरपालिका रुग्णालयात काही अंशी औषधे मोफत दिली जातात आणि काही औषधांची तांत्रीक कारणास्तव उपलब्धता नसेल तर ती बाहेरून आणावी लागतात. मात्र 1 फेब्रुवारी 2021 पासून महानगरपालिका रुग्णालयातील आंतररुग्ण व बाह्यरुग्ण अशा दोन्ही सेवांमधील रुग्णांना सर्व प्रकारची 100 टक्के औषधे महानगरपालिकेच्या वतीने मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
स्थानिक आमदारांना ऐनवेळी उदघाटनाचे आमंत्रण
या लोकार्पण सोहळ्याच्या काही तासांपूर्वी भाजपाचे स्थानिक आमदार गणेश नाईक यांना दुरध्वनी करून कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. त्यामुळे भाजपाशासित येथील महापालिकेच्या माध्यमातून उभ्या राहिलेल्या आरोग्य सेवेच्या उदघाटनांपासून भाजपाच्याच स्थानिक आमदारांना दूर ठेवण्याचा कुटील डाव सत्तेचा दबाव वापरून आखण्यात आला, असा आरोप करीत माजी महापौर जयवंत सुतार यांनी जळजळीत निषेध केला आहे.