पैसे दुप्पट करण्याच्या बहाण्याने कोट्यवधींचा गंडा

चौघांना बेड्या

पनवेल ः वीस महिन्यांमध्ये गुंतवणुक केलेली रक्कम दुप्पट करुन देणारी त्रिशुल गोल्ड नावांची स्किम चालवुन तसेच कमी कालावधीमध्ये अधिक परतावा देण्याचे अमिष दाखवून, 80 पेक्षा अधिक गुंतवणुकदारांकडून लाखो रुपये गुंतवणुक स्विकारुन त्यांना गुंतवणुक केलेली रक्कम परत न करता त्यांची सुमारे 2 कोटी रुपया पेक्षा अधिक रक्कमेची फसवणुक करणार्‍या चौकडी विरोधात आर्थिक गुन्हे शाखेने फसवणुकिसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करुन चौघांना अटक केली आहे. सध्या या प्रकरणात 80 गुंतवणुकदारांनी पोलिसांकडे धाव घेतली असली तरी, या प्रकरणात शेकडो गुंतवणुकदारांची फसवणुक झाली असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखा युनिट-1च्या पथकाने आरोपींची चौकशी सुरु केली आहे.  

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्यामध्ये विनिता अभिजीत पाटील (40), अभिजीत मधुकर पाटील (42), मुकुंद अशोक पुराणिक (39) योगेश राजाराम बिलये (48) या चौघांचा समावेश आहे. या चौघांनी 2017 मध्ये सीबीडी सेक्टर-15 मधिल ब्रम्हा-बी शॉपींग सेन्टर या इमारतीत वनिता एन्टरप्रायजेस नावाने कार्यालय सुरु केले होते. त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या गुंतवणुकीच्या योजना तयार करुन त्या लोकांपर्यंत पोहोचविण्यास सुरुवात केली होती. या चौकडीने तयार केलेल्या गुंतवणुकिच्या योजनेमध्ये 11 हजार व त्यापेक्षा जास्तीत जास्त रक्कम गुंतविल्यास 20 महिन्यामध्ये रक्कम दुप्पट करुन देण्याचे तसेच प्रति महिना 10 टक्के प्रमाणे पैसे देण्याचे अमिष दाखविण्यात आले होते. तसेच आणखी गुंतवणुकदार आणुन दिल्यास दोन टक्के कमिशन बोनस म्हणुन देण्याचे अमिष देखील या चौकडीने दाखवले होते.  त्यामुळे नवी मुंबईसह पनवेल, मुंबई, ठाणे आदी भागातील शेकडो नागरिकांनी या कंपनीच्या गुंतवणुक योजनेमध्ये लाखो रुपये गुंतविले होते.