मच्छी विक्रेत्या महिलांना लोकल प्रवाशांची परवानगी द्यावी- महादेवबुवा शहबाजकर

नवी मुंबई :मच्छी विक्रेत्या कोळी महिलांना रेल्वे लोकल प्रवाशासची परवानगी घ्यावी अशी मागणी अखिल भारतीय कोळी समाज सस्थेचे राज्य सरचिटणीस महादेवबुवा शहबाजकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. कोविड-19 संसर्ग रोखण्यासाठी देशात लागु करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे, सर्व उधोगधंदे, त्याचबरोबर सर्वसामान्यांचे रेल्वे, बस आदी सार्वजनिक वाहतुक बंद करण्यात आली आहे. हळूहळू लॉकडाऊन मध्ये शिथिलता येत असल्याने,शासकीय सेवेतील कर्मचारी, अत्यावश्यक सेवेतील कामगार आदींना रेल्वे लोकल प्रवासात मुभा दिली आहे. 

मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि रायगड जिह्यात मोठ्या प्रमाणात कोळी बांधव रहात असून त्यांचा मुख्य व्यवसाय हा मच्छीमार आणि विक्री  करणे आहे. मच्छी विक्रीतून  त्यांचा उदरनिर्वाह होत असतो. मात्र करोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे त्यांचा व्यवसाय ठफ्प झाला आहे. मात्र राज्य शासनाने लॉकडाऊनमध्ये शिथिलता देतांना मच्छीमार व मच्छी विक्रीला देखिल परवानगी देण्यात आली आहे. 

ठाणे,नवी मुंबई परिसरातील मच्छी विक्री  करणाऱया महिला पहाटे 4 वाजेच्या सुमारास मच्छी खरेदीसाठी मुबंई येथील भाऊचा धक्का येथे येतात,त्यानंतर त्या आपला विभागात मच्छी विक्रीचा व्यवसाय करतात,राज्य शासनाने शासकीय कर्मचारी व व्यवस्थापनातील कर्मचारी यांना दिलेल्या रेल्वे लोकल प्रवासा सोबत मच्छी विक्री करणाऱया कोळी महिलाना देखिल रेल्वे लोकल प्रवासाची परवानगी घ्यावी अशी मागणी महादेव (बुवा) शहबाजकर यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.