शंकर महादेवन बनले एक दिवसाचे पोलीस

नवी मुंबई : रस्ता सुरक्षा अभियानामध्ये नागरिकांचा देखील सहभाग असावा, तसेच त्यानिमित्ताने नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने नवी मुंबई वाहतुक विभागाच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या वन डे विथ पोलीस, या नाविन्यपुर्ण उपक्रमाची  सुरुवात सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी शुक्रवारी सकाळी वाशीतील शिवाजी चौकात केली. यावेळी शंकर महादेवन यांनी स्वत वाहतूक पोलीस बनून रस्त्यावर उतरुन वाहतुकीचे नियमन केले. यावेळी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त नितीन कुमार सिंग सहपोलीस आयुक्त जय जाधव, परिमंडळ-1चे पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे, वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड आदी मान्यवर उपस्थित होते.  

नवी मुंबई वाहतुक विभागाच्या वतीने 18जानेवारी ते 17 फेब्रुवारी दरम्यान, रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. त्यानिमित्ताने वाहतुक विभागाकडून वेगवेगळे उफाम व कार्यक्रमांचे  आयोजन करण्यात आले आहे. त्यापैकीच वन डे विथ पोलीस हा नाविण्यपुर्ण उपक्रम  देखील वाहतुक पोलिसांकडून राबविण्यात येत आहे. अक्सिडेंट फ्री सोसायटी करण्याच्या उद्देशाने रस्ता सुरक्षा अभियानात जास्तीत जास्त नागरिकांचा सहभाग असावा या उद्देशाने वाहतुक विभागाने हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमात  नागरिकांना एक दिवस वाहतुक पोलीस बनून वाहतुकीचे नियमन करण्याची संधी मिळणार आहे. यावेळी शंकर महादेवन यांनी वाहतुकीच्या नियमाबाबत जनजागृती करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी वाहतूक विभागाच्या वन डे विथ पोलीस या उपक्रमात सहभागी होऊन एक दिवस पोलीस बनण्याचे नागरिकांना आवाहन केले. यावेळी शंकर महादेवन यांनी स्वत रस्त्यावर उतरुन वाहतूक पोलीस बनून वाहतुकीचे नियमन केले. तसेच वाहतुकीचे नियम पाळणार्‍या वाहन चालकांचे आभार मानत त्यांना गुलाब पुष्प व त्यांचे आभार मानणारे कार्ड दिले. त्याचप्रमाणे वातुकीच्या नियमाचे उल्लंघन करणाऱया वाहनचालकांना समज देऊन त्यांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.  

यावेळी पोलीस आयुक्त बिपिनकुमार सिंग यांनी नागरिकांच्या सहभागाशिवाय वाहतुकीचे नियमन करणे अशक्य असल्याचे सांगून नागरिकांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करुन अपघात मुक्त शहर बनविण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन केले. तर वाहतुक विभागाचे पोलीस उपाआयुक्त पुरुषोत्तम कराड यांनी एक्सीडेंट फ्री सोसायटी करण्यासाठी रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत असल्याचे सांगुन वन डे विथ पोलीस या उपक्रमाची माहिती दिली. तसेच या अभियानात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी वाहतुक शाखेचे पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.