फेम योजनेतून मिळणार चार्जिंग स्टेशन

पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांचा निर्णय ; मा. खा. डॉ.संजीव नाईक यांनी घेतली भेट

नवी मुंबई ः नवी मुंबईत लवकरच पर्यावरण पूरक प्रवासासाठी पायाभूत सुविधांचा श्री गणेशा होणार आहे. माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांनी शुक्रवारी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची मुंबई येथे भेट घेतली. या भेटीमध्ये केंद्र सरकारच्या योजनेतून नवी मुंबईमध्ये इलेक्ट्रिक वाहने चार्जिंग करण्यासाठी ठीकठिकाणी चार्जिंग स्टेशन्स स्थापन करण्यास मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

आमदार गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली माजी खासदार डॉक्टर नाईक यांच्या पुढाकाराने नवी मुंबईमध्ये प्रदूषण विरहित आणि पर्यावरणपूरक प्रवासी वाहतूक व्यवस्था सुरू करण्यास सहकार्य मिळते आहे. नाईक यांच्यासह माजी खासदार डॉक्टर नाईक माजी आमदार संदीप नाईक आणि माजी महापौर सागर नाईक यांनी पर्यावरणमंत्री जावडेकर यांची भेट घेतली होती. या भेटीमध्ये जावडेकर यांनी नवी मुंबई शहरासाठी आणखी शंभर इलेक्ट्रिक बसेस मंजूर केल्या होत्या. यासंबंधी जावडेकर यांची भेट घेतली. याप्रसंगी त्यांच्यासमवेत नवी मुंबई परिवहन सेवेचे महाव्यवस्थापक शिरीष आरदवाड,कार्यकारी अभियंता अरविंद शिंदे, मुख्य लेखा परीक्षक निलेश नलावडे, उप अभियंता यशवंत कापसे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रदूषणरहित परिवहन सेवा देण्यामध्ये नवी मुंबई महापालिका इतर शहरांच्या तुलनेत एक पाऊल पुढेच राहिली आहे सीएनजी बसेस, हायब्रीड बसेस यानंतर आता इलेक्ट्रिक बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारच्या फेम योजनेअंतर्गत सध्या 30 इलेक्ट्रिक बसेस शहरात धावत असून 100 इलेक्ट्रिक बसेस पुढील काही दिवसात सुरू होणार आहेत. या बसेसचा प्रस्ताव लवकरात लवकर तयार करण्याच्या सूचना पर्यावरण मंत्री जावडेकर यांनी केंद्रीय सचिवांना दिल्या आहेत. इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढल्यास त्यासाठी चार्जिंग स्टेशन स्थापित करण्याची आवश्यकता असते. फेम योजनेतून नवी मुंबईसाठी इलेक्ट्रिक स्टेशन्स उपलब्ध करून देण्याची तयारी पर्यावरणमंत्री जावडेकर यांनी नाईक यांच्या भेटीमध्ये दाखवली. चार्जिंग स्टेशन स्थापित करण्यासाठी योग्य जागांचा प्रस्ताव दाखल करण्याच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत. त्यामुळे नवे मुंबईकरांना आता लवकरच अधिक पर्यावरणपूरक वातावरणात मोकळा श्वास घेत सुखकारक प्रवास करता येणार आहे. मंजूर झालेल्या नवीन 100 इलेक्ट्रिक बसेससह नवी मुंबईतील एकूण इलेक्ट्रिक बसची संख्या 230 वर जाणार आहे.