अखेर ‘रामाशिष्या’ने उचलले शिवधनुष्य

राम आशिष यादव यांचा गणेश नाईकांना रामराम ; शिवसेनेत केला प्रवेश

नवी मुंबई ः नवी मुंबई भाजपाचा बुरुज दिवसेंदिवस ढासळत चालला असून भाजपातून जोरदार आऊट गोेईंग सुरुच आहे. यादवनगर विभागावर पक्कड असणारे भाजपाचे नगरसेवक राम आशिष यादव यांनी आ. गणेश नाईक यांना रामराम ठोकून हाती शिवधनुष्य उचलले आहे. नगरविकास मंत्री व ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते शिवबंधन बांधून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. 

यादव नगर एमआयडीसी परिसरात राम आशिष यादव गेली तीस वर्षे सामाजिक आणि राजकीय कार्य करीत आहेत. दहा वर्षे त्यांनी या भागाचे लोकप्रतिनिधीत्व महापालिकेत केले आहे. गेल्यावर्षी गणेश नाईक यांनी भाजपात प्रवेश केल्यावर यादव यांनीही नाईकांना समर्थन देऊन भाजपात प्रवेश केला होता. सध्या नवी मुंबई पालिकेच्या निवडणुका जवळ येत असल्याने पक्षांतराचे जोरदार वारे वाहू लागले आहे. यामध्ये भाजपाला गळती लागली असून शिवसेनेत इनकमिंग सुरु आहे. कट्टर समर्थक साथ सोडू लागल्याने नवी मुंबईतील भाजपाला जोरदार हादरा बसला आहे. 

गत आठवड्यात महापालिकेच्या होऊ घातलेली निवडणूक लढवता येऊ नये यासाठी राजकीय आकसापोटी आपल्यावर कारवाई  होण्याची भीती यादव यांनी व्यक्त केली होती. तसेच पक्षांतरासाठी दबाव येत असून त्यांना होणारा त्रास एवढा वाढला आहे की आपल्यावर हल्ला देखील होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली होती. पोलीस प्रशासनाने आपल्या जीविताचे रक्षण करण्यासाठी पोलीस संरक्षण उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि पोलिस आयुक्त बिपिन कुमार सिंह यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली होती. यासगळ्या प्रकरणानंतर आता राम आशिष यादव यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे अखेर रामाशिष्याने उचलले शिवधनुष्य असा सूर नवी मुंबईत ऐकायला मिळत आहे.