लूटमारीच्या उद्देशाने तरुणावर गोळीबार

गोळीबार करणारे चौघे अटकेत

खारघर : पेण इथून नवी मुंबईत फिरण्यासाठी आलेल्या प्रतीक रवींद्र आहेर (24) या तरुणावर लुटमारीच्या उद्देशान शनिवारी रात्री खारघर इथं गोळीबार करून फरार झालेल्या चारही आरोपींना अटक करण्यात खारघर पोलिसांना यश आले आहे. धक्कादायक म्हणजे, लुटमारी करून मिळालेल्या पैशातून हॉटेल सुरू करण्याची या तरुणांची योजना असल्याचे तपासात आढळून आले आहे. पोलिसांनी या आरोपींकडून रिव्हॉल्वर व जिवंत काडतुस जप्त केले आहे. 

विपीन शैलेंद्र ठाकुर (19), गोपाल ननु सिंह (23), अभिनंदनकुमार गणेश शर्मा (23) आणि मुचन नागेंद्र ठाकुर (19) अशी या आरोपींची नावे आहेत. या आरोपींच्या गोळीबारात जखमी झालेला प्रतीक आहेर हा तरुण पेण शहरात राहण्यास असून तो शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पेण येथून मेस्ट्रो या मोटारसायकलवरून नवी मुंबईत फिरण्यासाठी आला होता. यानंतर रात्री 10 वाजण्याच्या सुमारास तो वाशी येथून सायन पनवेल मार्गे घरी जात असताना, कोपरा गाव बस स्टॉपच्या मागील रोडवर सिगरेट ओढण्यासाठी गेला होता. याचवेळी त्या ठिकाणी आलेल्या तिघा आरोपींनी प्रतिककडे मोबाईल, पैसे आणि त्याच्या मोटरसायकलच्या चावीची मागणी केली. मात्र, प्रतीकने त्यांना नकार दिल्याने एकाने प्रतीक जवळचा मोबाईल फोन जबरदस्तीने खेचण्याचा प्रयत्न केला. यामुळे प्रतीकने त्यांना विरोध केल्यानंतर त्यातील एका आरोपीने प्रतीक आहेर याच्या डाव्या पायाच्या मांडीवर आपल्याकडील रिवॉल्वरने एक गोळी झाडली होती.

या गोळीबारात प्रतीक जखमी झाल्यानंतर तिघा आरोपींनी त्या ठिकाणावरून पलायन केले होते. या घटनेची माहिती मिळ्यानंतर खारघर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी प्रतीक आहेर याला प्रथम खारघरमधील सिटी हॉस्पिटल आणि त्यानंतर कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल केले. पोलिसांनी खारघर परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज ततासले मात्र काहीच हाती लागले नाही. अखेर कोपरा गावातील एकमेव कॅमेरा तपासला असता त्यात गोळीबार झाल्याचं निदर्शनास आले. सदर तरुणांबाबत पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता, एक दिवसापुर्वीच तेथील चाळीमध्ये 4 तरुण राहाण्यासाठी आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्या भागात सापळा लावून त्याठिकाणी आलेल्या दोघा तरुणांना ताब्यात घेतले. त्यानंतर परिमंडळ-1 चे पोलीस उपआयुक्त सुरेश मेंगडे यांनी दोन्ही तरुणांकडे अधिक चौकशी केली असता, त्यांनी प्रतीकला लुटण्यासाठी त्याच्यावर गोळीबार केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी दोघांना अटक करुन त्यांच्या इतर दोघा साथिदारांना देखील अटक केली. तसेच त्यांनी ज्या रिव्हॉल्वरमधून गोळीबार केला. ते रिव्हॉल्वर व जिवंत काडतूस देखील जप्त केले.