भाजपमधून आऊट गोईंग सुरुच

भाजप नगरसेविका तनुजा मढवी राष्ट्रवादीत

नवी मुंबई : नवी मुंबई भाजपाला गळती लागली असून आ. गणेश नाईक यांना आणखी एक धक्का बसला आहे. शनिवारी यादवनगरमधील राम आशिष यादव यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर आज सोमवारी भाजपच्या नगरसेविका तनुजा मढवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी कमळाची साथ सोडून घड्याळासोबत चालण्याचा निर्णय घेतला आहे. 

ऐन महापालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजपला नवी मुंबईत आणखी एक मोठा धक्का बसला आहे. नगरसेविका तनुजा मढवी या प्रभाग क्र 83 च्या भाजपा नगरसेविका होत्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंतर्गत वादामुळे त्यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. गेल्या काही दिवसांआधीही काही नगरसेवकांनी भाजपची साथ सोडली. त्यामुळे नवी मुंबईत भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. आतापर्यंत 11 माजी नगरसेवकांनी भाजपला सोडसिठ्ठी देऊन शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.