वृक्षारोपण करून दिला बालिका व वृक्ष संवर्धनाचा संदेश

आयुक्तांसह अधिकार्‍यांनी केले कन्येच्या नावासह वृक्षारोपण

नवी मुंबई ः महानगरपालिका समाजविकास विभागाच्या वतीने 21 ते 26 जानेवारी 2021 या कालावधीत संपन्न झालेल्या राष्ट्रीय बालिका सप्ताहाची सांगता आयुक्त अभिजीत बांगर यांच्यासह इतर अधिकारी यांच्या हस्ते आपापल्या कन्येच्या नावासह वृक्षारोपण करून नेरूळ येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे वसुंधरा अभियान अंतर्गत संपन्न झाली.

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले व संजय काकडे, प्रशासन विभागाचे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज गरड, मुख्य लेखा परीक्षक दयानंद निमकर, शहर अभियंता सुरेंद्र पाटील, समाजविकास विभागाच्या उपआयुक्त क्रांती पाटील तसेच उपआयुक्त मनोजकुमार महाले, डॉ. बाबासाहेब राजळे, योगेश कडुस्कर, डॉ. श्रीराम पवार, परिवहन व्यवस्थापक शिरीष आरदवाड व मुख्य लेखा व वित्त अधिकारी निलेश नलावडे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

24 जानेवारी 2021 रोजी संपूर्ण देशभरात राष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्यात येतो. या अनुषंगाने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला व बालविकास विभागामार्फत 21 ते 26 जानेवारी 2021 या कालावधीत राष्ट्रीय बालिका सप्ताह साजरा करण्याचे निर्देशित करण्यात आले होते. यामध्ये मुलींच्या जन्माबाबत जनजागृती तसेच मुलींच्या समस्या व त्यावर मात करण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे सूचित करण्यात आले होते. त्यास अनुसरून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने बालिका कल्याण विषयक वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये 23 जाने. रोजी झउझछऊढ आणि चढझ या कायद्यांविषयी आयोजित मार्गदर्शनपर वेबिनारमध्ये सामाजिक कार्यकर्त्या प्रा. वृषाली मगदूम यांनी माहितीपूर्ण विवेचन केले. 24 जाने. रोजी डॉ. सुचेता किंजवडेकर यांनी मासिक पाळी काळातील स्वच्छता आणि आरोग्य याविषयी वेबसंवाद साधला. 25 जाने. रोजी विविध योजनांचा किशोरवयीन मुलींवरील प्रभाव याविषयी वेबिनारमधून स्वप्नाली चौधरी यांनी प्रकाशझोत टाकला. याशिवाय 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कोव्हीड काळात उल्लेखनीय काम करणार्‍या आरोग्य व स्वच्छता विभागातील 5 महिला कर्मचार्‍यांचा ध्वजारोहणानंतर आयुक्त अभिजीत बांगर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.