‘फ्लॅश मॉब’च्या अभिनव संकल्पनेद्वारे स्वच्छ सर्वेक्षणाचा मॉलमध्ये गजर

नवी मुंबई ः महानगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षणाच्या अनुषंगाने केलेली फ्लॅश मॉबची अभिनव संकल्पना कमालीची यशस्वी झाली आहे. मॉलमध्ये अचानक सादर झालेला फ्लॅश मॉबसारख्या अभिनव उपक्रमाने नागरिकांचे लक्ष वेधून घेत समुहाला आकर्षितही केले.

सर्व नागरिकांच्या एकत्रित प्रयत्नांतूनच नवी मुंबई शहराचा मागील वर्षी देशात तिसरा असलेला क्रमांक यावर्षी पहिला येईल असा विश्वास जागवणारी ही फ्लॅश मॉबची संकल्पना प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून वाशीमधील इनॉर्बिट मॉलमध्ये सायं. 6 वा. व सीवूड मधील ग्रँड सेंट्रल मॉलमध्ये रात्री 8 वा. राबविण्यात आली आणि कोणतीही पूर्वकल्पना नसताना अचानक घडणार्‍या या अभिनव उपक्रमामुळे स्वच्छतेचा संदेश नागरिकांपर्यंत अनोख्या पध्दतीने पोहचविण्यात आला.

कुटुंबासह मॉलमध्ये खरेदी करताना अचानक चोहोदिशांनी वाद्ये वाजू लागतात सगळ्या कोपर्‍यांतून गाण्याच्या तालावर नाचत उत्साही युवक-युवती मॉलच्या मध्यवर्ती ठिकाणी येतात. मग सुरू होतो गीतनृत्याचा अविष्कार. सुनो गौर से दुनियावालोसबसे आगे होंगे हिंदुस्थानी गाण्याच्या तालात गुंगून गेलेली हे गाणे संपते, पण ठेका सुरूच राहतो आणि लोकगीताच्या परंपरेतील जोगवा सुरू होतो. या जोगव्याचा ठेका तोच असला तरी त्याचे शब्द मात्र वेगळे असतात. निश्चय केला नंबर पहिला नवी मुंबईचा, क्लिनर टुडे बेटर टुमारो हाच ध्यास माझा या शब्दांच्या तालावर हा युवा नृत्यसमुह तालबध्द झुलत असतो. मॉलमध्ये उपस्थित प्रत्येकाच्या मनात आपल्या नवी मुंबई शहराला यावर्षी स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये देशात पहिला नंबर मिळवून द्यायचाच, हा निर्धार हे युवक तेथे उपस्थित प्रत्येकाच्या मनात ठसवतात आणि गीतनृत्याच्या शेवटी दिल्या गेलेल्या भारतमाता की जय च्या गजरासोबतच  निश्चय केला नंबर पहिला घोषणेमध्येही नागरिक आपला सूर मिसळतात.

स्वच्छ सर्वेक्षणाच्या जनजागृतीसाठी महानगरपालिका विविध माध्यमांचा उपयोग करीत असून चौकाचौकात, वर्दळीच्या ठिकाणी होणार्‍या स्वच्छताविषयक जनजागृतीपर पथनाट्य, नृत्यनाट्य यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामध्ये अत्यंत वेगळ्या पध्दतीने दोन्ही मॉलमध्ये अचानक सादर झालेला फ्लॅश मॉबसारख्या अभिनव उपक्रमाने नागरिकांचे लक्ष वेधून घेत समुहाला आकर्षितही केले. गीतनृत्याच्या माध्यमातून  स्वच्छतेचा संदेश प्रसारित करणार्‍या या उपक्रमाला नागरिकांची मोठ्या प्रमाणावर पसंती लाभली.