कामचुकार कर्मचार्‍यांवर भरारी पथकांचा वॉच

पनवेल पालिका आयुक्तांकडून दखल ; अचानक भेटी देण्याच्या सूचना

पनवेल : वारंवार समज देऊनही पनवेल पालिकेतील काही कर्मचारी, अधिकार्‍यांचे बेशिस्त वर्तन सुरूच आहे. यामुळे पालिका प्रशासनाची प्रतिमा मलिन होत असल्याने पालिका आयुक्तांनी आता कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. यासाठी चार भरारी पथकांची स्थापना करण्यात आली असून हे पथक अचानक कार्यालयांस भेटी देणार आहे.

पनवेल पालिकेचा कारभार आधीच कमी मनुष्यबळावर सुरू आहे. त्यात कामचुकार अधिकारी, कर्मचार्‍यांमुळे याचा ताण पडत आहे. तसेच या बेशिस्तीमुळे थेट सभांमध्ये सदस्यांकडून तक्रारी मांडल्या जात आहेत. असे असताना शनिवार, रविवार सुट्टी व मंगळवारी प्रजासत्ताक दिनाची सुट्टी असल्याने सोमवारी 23 कर्मचारी काहीही न सांगता गैरहजर राहिले. याची गंभीर दखल पालिका आयुक्तांनी घेतली आहे. यासह कामात वेळकाढूपणा, प्रशासकीय इमारत तसेच प्रभाग कार्यालयांबाहेर दिसणारे कर्मचारी, स्वत:चे आसन सोडून फेरफटका मारणारे कर्मचारी तसेच कार्यालयाबाहेर पडताना नोंदवहीत नोंद न करणारे कर्मचारी यांच्यावर आता भरारी पथक लक्ष ठेवणार आहे. या पथकामध्ये सेवानिवृत्त सैन्यदलाचे कर्मचारी सदस्य असणार आहेत.

हे पथक सतर्कता विभागाप्रमाणे बेशिस्त अधिकारी व कर्मचार्‍यांवर लक्ष ठेवणार आहेत. हे पथक कोणत्याही कार्यालयात कधीही भेट देणार असून यात बेशिस्तपणा आढळल्यास त्याचा अहवाल विभागप्रमुखाला देणार आहे. संबंधित विभागप्रमुख संबंधीची कारवाई तपशील या पथकाला देणार आहे. जर विभागप्रमुख संबंधित कर्मचार्‍याला पाठीशी घालत असतील तर त्याची चौकशी उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त व आयुक्त स्तरावरील अधिकारी करणार आहेत.

या भरारी पथकामध्ये सुरेश गांगरे, रमेश पाटील या पालिकेच्या अधीक्षकांसह सेवानिवृत्त सैन्यदलाचे कर्मचारी अमीर घोलप यांच्यासह सुरक्षारक्षक संदीप सावंत यांची नियुक्ती पालिकेने केली आहे. तसेच विभागप्रमुख त्यांच्या मर्जीतील कर्मचार्‍यांना सोयीनुसार कामांचे वाटप करतात. याच्याही तक्रारी आहेत. त्यामुळे सर्व कर्मचार्‍यांना समान कामाचे वाटप करावे तसेच सकाळी पावणेदहा ते सायंकाळी सव्वासहा ही कार्यालयीन वेळ पाळावी असे आवाहन आयुक्तांनी केले आहे. याची अंमलबजावणी न झाल्यास यावर कारवाई करण्यात येणार आहे.