मनसे-भाजप युतीची शक्यता

गणेश नाईकांच्या राजकीय चालीकडे विरोधकांचे लक्ष

नवी मुंबई ः भारतीय जनता पक्षातून आतापर्यंत सोळा नगरसेवकांनी विविध पक्षात पक्षांतर केले असले तरी माजी मंत्री गणेश नाईक यांनी याबाबत कोणतीही नकारात्मक प्रतिक्रिया न दिल्याने विरोधक बुचकळ्यात पडले आहेत. दरम्यान, महापालिका निवडणुकीसाठी गणेश नाईक मनसेसोबत छुपी युती करण्याची शक्यता असल्याने नाईकांच्या या राजकीय चालीकडे विरोधकांचे लक्ष लागले आहे. 

मोठ्या पडझडीनंतरही गणेश नाईकांची स्थितप्रज्ञता विरोधकांना बुचकळ्यात टाकणारी असून गणेश नाईक कोणती राजकीय खेळी खेळतात याकडे नवी मुंबईकरांचे लक्ष लागून राहिले आहे. गेली 25 वर्षे त्यांना साथ देणार्‍या अनेकांनी यावेळी शिवसेना, राष्ट्रवादीला जवळ केल्याने ही निवडणुक नाईकांना जड जाईल असा अंदाज राजकीय समिक्षक वर्तवित आहेत. याउलट नाईकांची साथ सोडणार्‍या नगरसेवकांबाबत एकही चकार शब्द नाईक उच्चारत नसून उलट त्यांना ‘नांदा सौख्य भरे’चा आशिर्वादच देत आहेत. आतापर्यंत सोळा नाईक समर्थक नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यामध्ये सुरेश कुलकर्णी, नवीन गवते, राम आशिष यादव सारख्या दिग्गजांचा समावेश असून त्यांचा सूमारे दहा ते अकरा मतदारसंघावर मोठा प्रभाव आहे. ज्या मतदार संघाचे नेतृत्व आ.गणेश नाईक करतात त्या ऐरोली मतदार संघाला महाविकास आघाडीने मोठे भगदाड पाडले आहे. त्यामुळे यावेळी नाईकांची मदार बेलापुर मतदार संघातून दुसर्‍यांदा आमदारकी भुषवणार्‍या मंदा म्हात्रे यांच्यावर आहे. नाईक आणि म्हात्रे यांच्यातून विस्तव जात नसल्याची चर्चा असली तरी त्यांच्यातील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न भाजपच्या वरिष्ठ पातळीवरुन होत आहे. 

निवडणुकीची आचारसंहिता फेब्रुवारी महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात लागण्याची चर्चा असून तोपर्यंत अजून राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. संयमाचे राजकारण करण्यास प्रसिद्ध असलेले गणेश नाईक जोपर्यंत महाविकास आघाडीचे जागा वाटप निश्‍चित होऊन उमेदवारी जाहीर होत नाही तोपर्यंत आपले पत्ते खोलणार नसल्याचे बोलले जात आहे. नाईकांनी महाविकास आघाडीतील संभाव्य तगड्या बंडखोरांशी आतापासूनच संपर्क करण्यास सुरुवात केली आहे. मनसेनेही नवी मुंबईत हातपाय पसरवण्यास सुरुवात केली असून अनेक कामगारांचे प्रश्‍न त्यांनी मार्गी लावले आहेत. शर्मिला ठाकरे यांनी नवी मुंबईत भेट देऊन कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे नाईक काही ठिकाणी कमजोर उमेदवार देऊन त्या जागा अप्रत्यक्षपणे मनसेच्या पदरात टाकून छुपी आघाडी करण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. नाईकांची चुप्पी बरेच काही सांगून जात असली तरी प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यावरच ठोस भुमिका घेतील असे बोलले जाते. 

नाईकांना दगाफटक्याची शक्यता
 बर्‍याच नगरसेवकांनी जरी भाजपला रामराम ठोकला असला तरी निवडणुक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर तुर्भे, कोपरखैरणे आणि नेरुळ मधून अजून काही नगरसेवक नाईकांची साथ सोडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. स्वतः शरद पवार, अजित पवार व शिवसेेनेचे एकनाथ शिंदे संभाव्य फुटीर नगरसेवकांशी संपर्कात असून त्यामध्ये तुर्भ्यातील 2, नेरुळमधील 2, कोपरखैरणे व सानपाडामधील एका नगरसेवकाचा समावेश आहे. ऐनवेळी दगाफटका होऊ नये म्हणून नाईक कोणती दक्षता घेतात याकडे भाजपाचे लक्ष आहे.