लॉकडाऊन काळात तिजोरीची ‘सफाई’

संजयकुमार सुर्वे

टाळेबंदीतही रस्ते साफसफाईसाठी कोट्यावधींचा खर्च

नवी मुंबई ः महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने लॉकडाऊन काळात कामे न करताही अदा केलेल्या बिलांचा लेखाजोखा जनतेसमोर आल्यानंतर आता स्वच्छता विभागाचाही अशाचप्रकारचा लेखाजोखा माहिती अधिकारात उघडकीस आला आहे. राज्य शासनाने कोरोना संक्रमणात कडक लॉकडाऊन जाहीर केले असतानाही या विभागाने एप्रिल, मे, जून, जुलै महिन्यात रस्त्यांची यांत्रिकी पद्धतीने सफाई करुन ठेकेदाराला कोट्यावधींची बिले अदा केली आहेत. स्वच्छता विभागाच्या या ‘आपदा मे अवसर’ शोधण्याच्या कार्यशैलीचे कौतुक नवी मुंबईत होत आहे. 

देशात 22 मार्चपासून केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केले होते आणि जूनपासून टप्प्याटप्प्याने अनलॉकची प्रक्रिया राज्य सरकारने सुरु केली होती. एप्रिल आणि मे या कालावधीत आरोग्य सेवा, अग्निशमन सेवा व  अत्यावश्यक सेवांशिवाय कोणालाही कोठेही फिरु दिले जात नव्हते. देशातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुर्णपणे बंद असल्याने लोकांना एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाण्यास बंदी होती. अशा निर्बंधातही पालिकेच्या स्वच्छता विभागाने कोरोना स्वच्छादुत म्हणून केलेली कामगिरी नवी मुंबईकरांच्या चांगलीच लक्षात राहील. नवी मुंबई पोलीसांनी परिमंडळ 1 आणि 2 या विभागात रस्त्यांवर बॅरीकेटिंग केले असतानाही तेथील रस्त्यांची यांत्रिक साफसफाई करणार्‍या ठेकेदारांनी आपले कर्तव्य पार पाडत लॉकडाऊन काळातही व्यवस्थित सफाई केली. जिवावर उदार होऊन कोरोना काळात केलेल्या या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना कोट्यावधी रुपयांची बिले पालिकेकडून अदा करण्यात आली आहेत. लॉकडाऊन काळात एकही दिवस रजा न घेता रस्त्यांच्या साफसफाईसह पालिकेच्याही तिजोरीची सफाई करणार्‍या स्वच्छता विभागाचे कौतुक नवी मुंबईकरांकडून होत आहे. 

सुरुवातीपासून वादात सापडलेल्या या 64 कोटींच्या कामांवर स्थानिक लेखानिधी परिक्षकांनी गंभीर आक्षेप नोंदवले असून संबंधित कंत्राटदारांना 28 कोटी रुपये अतिरिक्त दिल्याचा ठपका ठेवला आहे. 2014 पासून हा ठपका संचालक स्थानिक लेखानिधी विभागाने कायम केला असतानाही संबंधित रक्कम वसूल करण्याची कोणतीही कारवाई आतापर्यंत पालिकेत आलेल्या एकाही आयुक्तांनी किंवा पालिकेच्या मुख्य लेखापरिक्षकांनी केलेली नाही. हा अहवाल स्थायी समितीने दप्तरी दाखल केल्याने ‘हमाम मे सब नंगे’ असल्याची चर्चा नवी मुंबईत आहे. 

स्वच्छ भारत अभियानातर्गंत शेकडो कोटींची कामे गेली चार वर्षात स्वच्छता विभागाकडून केली असून पालिकेच्या तिजोरीवरील भार कमी करण्यास हा विभाग तज्ञ मानला जात आहे. लॉकडाऊन काळात पालिकेच्या उद्यान विभागाने ठेकेदाराला काम न करता अदा केलेल्या बिलांचे प्रकरण ताजे असताना स्वच्छता विभागाच्या या स्वच्छ तिजोरी अभियानाची चर्चा सध्या पालिकेत आहे. पालिका आयुक्त अभिजीत बांगर याप्रकरणी कोणती भुमिका घेतात याकडे आता नवी मुंबईकरांचे लक्ष लागले आहे. 

30.92 कोटींची वसूली कधी? 
शासनाच्या स्थानिक लेखानिधी परिक्षकांनी संबंधित ठेकेदारांकडून 30.92 कोटी रुपये वसूल करावेत असा अहवाल पालिकेला सादर केला आहे.  परंतु गेली सहा वर्ष पालिकेच्या एकाही आयुक्तांनी या लेखा परिक्षण अहवालाची दखल न घेता रक्कम वसूलीची कोणतीही कारवाई ठेकेदारांवर केली नाही.
किती पैसे केले अदा
अ) मे. बीव्हीजी इंडिया लिमी. 
1. एप्रिल 25,28,820/-
2. मे 26,05,932/-
ब) मे. अ‍ॅन्टोनी वेस्ट हँडलींग प्रा. लिमी.
1. एप्रिल 27,41,422/-
2. मे 28,20,792/-

22 मार्चपासून एप्रिल आणि मे पर्यंत राज्यात कर्फ्यु वजा लॉकडाऊन पाळला गेला होता. प्रत्यक्षात या काळात अत्यावश्यक सेवा फक्त सुरु होत्या. तसेच देखभाल दुरुस्तीची महत्वाची कामे पालिकेतर्फे हाती घेण्यात आली होती. यांत्रिकीकरणाने रस्त्यांची सफाई एप्रिल आणि मे मध्ये केली किंवा नाही याची खातरजमा करण्यात येईल. संबंधित विभागाकडून याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यावरच तक्रारीची योग्य ती दखल घेण्यात येईल.  - अभिजित बांगर, आयुक्त, न.मुं.म.पा