कोविड लढ्यातील उल्लेखनीय कार्याबद्दल सिडकोचे एमडी डॉ. संजय मुखर्जी यांना सकाळ सन्मान पुरस्कार

नवी मुंबई ः कोविड-19 विरुद्धच्या लढ्यात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांना 30 जानेवारी 2021 रोजी दैनिक सकाळच्या मुंबई आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सव वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सकाळ सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस व माजी खासदार, अनिल देशमुख, गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य, डॉ. राजेंद्र शिंगणे, अन्न व औषध प्रशासन मंत्री, महाराष्ट्र राज्य, राजेश टोपे, आरोग्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, अनिल परब, परिवहन व संसदीय कार्ये मंत्री, महाराष्ट्र राज्य, प्रवीण दरेकर, विरोधी पक्ष नेता व प्रतापराव पवार, अध्यक्ष, सकाळ माध्यम समूह यांचीही उपस्थिती लाभली.

सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी डॉ. संजय मुखर्जी हे राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाच्या (मेडिकल एज्युकेशन न्ड ड्रग्ज डिपार्टमेन्ट - मेड) सचिवपदी कार्यरत होते. त्यांच्या रूपाने या विभागाला प्रथमच वैद्यकीय पार्श्वभूमी असलेला अधिकारी सचिव म्हणून लाभला. कोविड-19 महासाथीच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉ. संजय मुखर्जी यांच्या नेतृत्वाखाली या विभागाने उल्लेखनीय कार्य केले. तसेच कोविड-19 विरुद्धच्या कृती दलाचेही (टास्क फोर्स) ते सदस्य होते. या विभागातर्फे संपूर्ण राज्यात विशेष कोविड-19 कक्ष, अतिदक्षता विभाग आणि विलगीकरण खाटा या सुविधांसह सज्ज असलेली 19 कोविड समर्पित रुग्णालये स्थापन करण्यात आली. वैद्यकीय/निमवैद्यकीय व्यावसायिकांकरिता प्रशिक्षण आणि संकटकालीन बचाव प्रशिक्षण (मॉक ड्रिल) आयोजित करण्यात आले. पर्यायी उपचार पद्धतींसाठी आयुष कृती दलाची स्थापनाही करण्यात आली. प्लॅन्टा या जगातील सर्वांत मोठ्या रक्त द्रव उपचार पद्धती (प्लाझ्मा थेरपी) चाचणी प्रकल्पाच्या उभारणीकरिता डॉ. संजय मुखर्जी यांनी पुढाकार घेतला.     

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रतिपिंड (अँटीबॉडी), फॅविपिरावीर, प्लाझ्मा (प्लॅसिड आणि प्लॅटिना चाचण्या) यांसंबंधी चाचण्यांसह कोविड-19 वर मोठ्या प्रमाणावर संशोधन सुरू करण्यात आले. प्लॅसिड चाचणी, बीसीजी उपचार, बीसीजी लसीची चाचणी, कोविड-19 बाधित गर्भवती मातांची नोंदणी इ. संशोधन प्रकल्पही मेडतर्फे सुरू करण्यात आले. मेडतर्फे डॉ. संजय मुखर्जी यांनी मुख्य संपादक म्हणून संपादित केलेली कोविड-19 करीता ऑपरेशनल मोड्युल, कोविड-19 व्यवस्थापनाकरिता सूचनांचा सारसंग्रह, व्हीआरडीएल प्रयोगशाळांकरिता निर्देश पुस्तिका इ. प्रकाशित करण्यात आले. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन क्षेत्राला खाजगी क्षेत्रातील तज्ज्ञांना लाभ व्हावा म्हणून अनेक संस्थांबरोबर सामंजस्य करार करण्यात आले. अनेक वैद्यकीय महाविद्यालये प्रस्तावित असून येत्या शैक्षणिक वर्षात ही महाविद्यालये सुरू होणार आहेत. डॉ. संजय मुखर्जी यांच्या कार्यकाळात एमबीबीएस आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी आतापर्यंत सर्वाधिक जागा वाढविण्यात आल्या.   या कार्यक्रमाची अनमास्किंग हॅपीनेस विथ मास्क ही संकल्पना होती. मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात डॉ. संजय मुखर्जी यांच्यासह कोविड-19 च्या काळात उल्लेखनीय कार्य केलेल्या अन्य कोविड योद्ध्यांनाही सन्मानित करण्यात आले.