Breaking News
नवी मुंबई ः पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेअंतर्गत रविवारी नवी मुंबई महानगरपालिकेच्या 23 नागरी आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांचे दवाखाने, सोसायटी कार्यालये, रूग्णालये, रेल्वे स्टेशन, बस डेपो, महत्वाचे नाके अशा विविध ठिकाणी 738 लसीकरण बूथ स्थापन करण्यात आले होते. यामध्ये 70 हजार 677 बालकांना पोलिओ लसीकरण करण्यात आले.
‘दोन थेंब प्रत्येक वेळी, पोलिओवर विजय दरवेळी’ या घोषवाक्यास अनुसरून 5 लाखाहून अधिक घरांपर्यंत नागरी आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून मोहीमेची माहिती पोहचवून 760 पथकांव्दारे जनजागृती करण्यात आली होती. या पथकांच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी 160 पर्यवेक्षक होते. 800 हून अधिक बॅनर्स आणि 3 हजारहून अधिक पोस्टर्समधून व्यापक प्रमाणात माहिती प्रसारित करण्यात आली. साधारणत: 86 हजार 855 इतके 5 वर्षाखालील लाभार्थी नजरेसमोर ठेवून या मोहिमेचे नियोजन करण्यात आले होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लसीकरण बूथवरील 2 हजारहून अधिक कर्मचारी, स्वयंसेवक यांना कोव्हीड सुरक्षाविषयक बाबींचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना व प्रशिक्षण देण्यात आले होते. नागरिकांनी परस्परांमध्ये सुरक्षित अंतर राखावे यादृष्टीने बुथसमोर वर्तुळे आखण्यात आली होती. मास्कचा वापर स्वयंसेवकांसह नागरिकांनाही अनिवार्य करण्यात आला होता. बालकाला लस पाजण्यापूर्वी व पाजल्यानंतर हात सॅनिटाईज करण्यात येत होते. लस देताना बालक पालकाकडेच असेल याची काळजी घेऊन लांबूनच बाळाला स्पर्श न करता तसेच ड्रॉपरचा स्पर्श बाळाच्या तोंडाला होणार नाही याची दक्षता घेऊन लस पाजण्यात येत होती. अशा प्रकारची काळजी सर्व पोलिओ बुथवर घेण्यात येत होती. तथापि काही कारणांमुळे ज्या संभाव्य लाभार्थी बालकांचे लसीकरण होऊ शकले नाही त्यांना 2 ते 6 फेब्रुवारी 2021 या कालावधीत घरोघरी जाऊन पल्स पोलीओ डोस देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai