लोकल प्रवासात वेळेचं पालन न केल्यास दंडात्मक कारवाई

मुंबई : मागील 10 महिन्यांपासून बंद असलेली मुंबईची लाईफलाईन आजपासून सर्वसामान्यांसाठी खुली झालेली आहे. मात्र ठराविक वेळेत सर्वसामान्यांना लोकल प्रवास करता येणार आहे. पहिल्या लोकलपासून सकाळी 7 वाजेपर्यंत, तर दुपारी 12 वाजल्यापासून ते दुपारी 4 वाजेपर्यंत आणि रात्री 9 वाजल्यापासून ते शेवटच्या लोकलपर्यंत सर्वसामान्यांना प्रवास करता येणार आहे. मात्र वेळेचं बंधन तोडल्यास मुंबईकरांवर दंडाची कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी तुरुंगवास आणि 200 रुपयांचा दंडही आकारण्यात येणार आहे.

आजपासून मुंबई लोकलची दारं सर्वसामान्य प्रवाशांसाठी खुली करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. तसेच रेल्वे मंत्रालयाकडूनही सर्वसामान्यांच्या लोकल प्रवासाला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मुंबईकरांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. 

मुंबई लोकलमध्ये ठरवून दिलेल्या वेळेव्यतिरिक्त प्रवास केल्यास तुम्हाला याची शिक्षा होऊ शकते. निर्धारित वेळेतच प्रवास न केल्यास 200 रुपये दंड आणि 1 महिन्याचा तुरुंगवास अशी शिक्षा होऊ शकते. त्यामुळं रेल्वेनं प्रवास करताना वेळेचं भान ठेवणं यापुढे अतिशय महत्त्वाचं असणार आहे. पहाटे पहिल्या लोकलपासून सकाळी 7 वाजेपर्यंत, दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत आणि रात्री 9 वाजल्यापासून अखेरच्या लोकलपर्यंत सर्व प्रवाशांना लोकल प्रवासाची मुभा असेल. पण, यादरम्यानच्या वेळांमध्ये परवानगी नसतानाही प्रवास करणार्‍यांना शिक्षा होणार आहे.