मेट्रोकरिता वाढीव चटई क्षेत्र निर्देशांक मंजूर

सिडकोकडून सामान्य विकास नियंत्रण नियमावलीमध्ये बदल 

नवी मुंबई ः सिडकोतर्फे नवी मुंबई मेट्रो प्रकल्पांतर्गत साकारण्यात येत असलेल्या मेट्रो मार्गालगतच्या जमिनीकरिता वाढीव चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) मिळावा याकरिता नवी मुंबईच्या सामान्य विकास नियंत्रण नियमावलीमध्ये (जीडीसीआर) बदल करण्यात आले आहेत.  

भारत सरकारने परिवहन केंद्रीत विकास धोरण (ट्रान्झिट ओरिएन्टेड डेव्हलपमेन्ट पॉलिसी) तयार करून त्या अंतर्गत ट्रान्झिट स्थानक किंवा मार्गापासून चालत जाता येण्याएवढ्या 500 मी. ते 800 मी. पर्यंतच्या प्रभाव क्षेत्रांतील (इनफ्लुएन्स झोन) जमिनीचा मिश्र वापर करून विकास साधण्यावर भर देण्यात आला आहे. तसेच यामध्ये सदर जमिनीसाठी वाढीव चटई क्षेत्र निर्देशांक मंजूर करणेही अंतर्भूत आहे. यामुळे स्थानकांपासून चालत जाण्याच्या अंतरापर्यंत लोकांची वर्दळ वाढून सार्वजनिक वाहतुकीमध्ये वाढ होण्यासह प्रदूषण आणि वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. महाराष्ट्र शासनानेही याच धरतीवर आपले नागरी परिवहन धोरण आखले आहे. सिडकोतर्फे नवी मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी नवी मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत सीबीडी बेलापूर रेल्वे स्थानक-खारघर-तळोजा-एमआयडीसी तळोजा-कळंबोली-कामोठे-खांदेश्वर रेल्वे स्थानक या मार्गावर मेट्रो मार्ग क्र. 1, 2 आणि 3 विकसित करण्यात येत आहेत. वाढीव चटई क्षेत्र निर्देशांकामुळे मेट्रो मार्गालगतच्या जमिनीचा निवासी वापरही करता येणार आहे. यापूर्वीच नागपूर मेट्रो मार्गालगतच्या जमिनीसाठीही वाढीव चटई क्षेत्र निर्देशांक राज्य शासनातर्फे मंजूर करण्यात आला आहे. प्रस्तावित नवी मुंबई मेट्रो मार्गांलगत अंदाजे 100 हेक्टर जमीन आहे. परिवहन केंद्रीत विकासाचा भाग म्हणून साकार होत असलेल्या मेट्रो मार्गालगतच्या जमिनीकरिता वाढीव चटई क्षेत्र निर्देशांक देण्याकरिता नवी मुंबईच्या सामान्य विकास नियंत्रण नियमावलीमध्ये त्या अनुषंगाने बदल करण्यात आले आहेत. 

या निर्णयामुळे नवी मुंबई मेट्रो प्रकल्पाची जलद गतीने अंमलबजावणी होण्यास मदत होऊन नवी मुंबईकरांच्या सेवेसाठी हा प्रकल्प लवकरात लवकर दाखल होणे शक्य होणार आहे. - डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक. सिडको