महापौर महाविकास आघाडीचाच होणार

शिवसेना उपनेते विजय नाहटा यांचा विश्‍वास

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीमध्ये आघाडीचीच सत्ता येणार असून, महापौर महाविकास आघाडीचाच होणार असल्याचा विश्वास शिवसेना उपनेते तथा पर्यावरण समाघात प्राधिकरणाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष विजय नाहटा यांनी व्यक्त केला. रविवारी (दि. 31 जानेवारी) वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात नाहटा यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.

पक्षावरील निष्ठा व प्रामाणिकपणाचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नाहटा असल्याचे गौरवोद्गार माजी मंत्री शशिकांत शिंदे यांनी केले. मागील विधानसभा निवडणुकीत नाहटा यांना राष्ट्रवादी काँग्रेसने देऊ केलेली उमेदवारी नाकारत त्यांनी युतीचा धर्म पाळला असल्याचे शिंदे म्हणाले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विजय नाहटा फाउंडेशनच्यावतीने नवी मुंबईतील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रांमध्ये कार्य करणार्‍या संस्था आणि संघटनांना आर्थिक मदत म्हणून धनादेशाचे वाटप करण्यात आले. या सोहळ्याचे आयोजन नवी मुंबई शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात आले होते. यावेळी खासदार राजन विचारे, माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले, राष्ट्रवादीचे नवी मुंबई निरीक्षक प्रशांत पाटील, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संतोष शेट्टी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशोक गावडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर पाटकर, महिला जिल्हा संघटक रंजना शिंत्रे, पुष्पा नाहटा, आदी मान्यवर महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.