नवी मुंबईत शाळेची घंटा वाजणार

पालकांना शाळेचा मेसेज ; काय काय करावं लागणार?

नवी मुंबई : राज्यातील 5 वी ते 10 पर्यंतच्या शाळा 27 जानेवारीपासून सुरु करण्यात आल्या आहेत. त्यानुसार काही जिल्ह्यातील शाळा सुरु झाल्या आहेत. 8 फेब्रुवारीपासून नवी मुंबईतील शाळांची घंटा वाजणार आहे. नवी मुंबईतील काही खासगी शाळा येत्या सोमवारपासून सुरु होणार आहेत. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने सुरु राहणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र आता सर्व पूर्ववत होत असून अनेक ठिकाणच्या शाळा पुन्हा सुरु केल्या जात आहे. 

काही दिवसांपूर्वी पनवेल महानगरपालिकाने इयत्ता 5 वी ते 12 वी पर्यंतचे वर्ग असलेल्या सर्व माध्यमांच्या शाळा सुरु करण्यासंदर्भातील परिपत्रक जारी केलं होतं. त्यानुसार महापालिकेच्या सर्व शाळा गेल्या 27 जानेवारीपासून सुरु करण्यात आल्या होत्या. यानंतर आता इतर खासगी माध्यमांच्या शाळांनीही प्रत्यक्ष शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक खासगी शाळांनी याबाबत पालकांना मॅसेज पाठवत काही सूचना केल्या आहेत. एका सीबीएसई शाळेने पालकांना पाठवलेल्या मॅसेजनुसार, येत्या 8 फेब्रुवारीपासून शाळा सुरु करण्यात येत आहे. शाळांचा वेळ आणि टाईमटेबल काही दिवसांनंतर शेअर केले जाईल. विद्यार्थ्यांसाठी बसची सुविधा देण्यात येणार आहे. बस सुविधेचा लाभ घेण्यासाठी पालकांनी बसचा फॉर्म भरणे आवश्यक आहे.

पालकांसाठी सूचना

  1. सद्यस्थितीत 1 ते 23 हे हजेरी क्रम असलेले विद्यार्थी सोमवार, बुधवार आणि शुक्रवार प्रत्यक्ष शाळेत उपस्थित राहतील. त्याचदरम्यान 24 पासून पुढे हजेरी क्रमांक असलेले विद्यार्थी घरातून ऑनलाईनद्वारे शाळेत उपस्थित राहतील.
  2. तर 24 पासून पुढे हजेरी क्रमांक असलेले विद्यार्थी मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी प्रत्यक्ष शाळेत हजेरी लावतील. त्यादरम्यान 1 ते 23 हे हजेरी क्रम असलेले विद्यार्थी ऑनलाईनद्वारे शाळेत उपस्थित राहतील.
  3. दरम्यान सर्व पालकांनी त्यांच्या पाल्याला शाळेत पाठवण्यासाठी दिलेल्या संमती फॉर्मची हार्डकॉपी शाळेत पाठवणे गरजेचे आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जाणार नाही, असे यात नमूद करण्यात आले आहेत.