अधिकार्‍यांविरोधात सत्ताधार्‍यांची निदर्शने

पनवेल ः पालिका प्रशासनातील अधिकार्‍यांच्या वाढत्या बेजबाबदारपणामुळे सत्ताधारी भाजप आक्रमक झाले असून त्यांनी 2 फेब्रुवारी रोजी पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या दालनाबाहेर निदर्शने केली. या अधिकार्‍यांवर बुधवार (दि. 3)पर्यंत प्रशासनाने कारवाई केली नाही, तर भाजप-आरपीआयच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

पालिका प्रशासनातील अधिकारी बेशिस्त वागत आहेत. बैठकींना वेळेवर उपस्थित राहत नाहीत. सत्ताधारी नगरसेवकांना योग्य मान देत नसल्याचा आरोप करीत सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली 2 फेब्रुवारी रोजी पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या दालनाबाहेर निदर्शने करण्यात आली. यावेळी उपमहापौर जगदीश गायकवाड, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, प्रभाग अ समिती सभापती अनिता पाटील, समीर ठाकूर, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, नगरसेविका हेमलता म्हात्रे, रुचिता लोंढे उपस्थित होते. 

मंगळवारी सत्ताधारी भाजपच्या वतीने दुपारी 3 वाजता बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला पालिकेचे अधिकारी अर्धा तास उशिरा आले. यानंतरच्या बैठकीतदेखील हीच परिस्थिती होती. मासळी मार्केटमधील स्वच्छतेबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी सहायक आयुक्त धैर्यशील जाधव यांनी या परिसरात खोटे उत्तर दिले असल्याचा आरोप सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केला. यापूर्वी विधी विभागाच्या बैठकीतदेखील अधिकारी आम्हाला समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत. पालिका प्रशासनातील अधिकार्‍यांचा बेजबाबदारपणा वाढत चालला आहे. महापौरांनादेखील हे अधिकारी मान देत नसून प्रशासनाचा या अधिकार्‍यांवर वचक नसल्याने या बेशिस्त अधिकार्‍यांचा निषेध करण्यासाठी आम्ही आयुक्तांच्या दालनाबाहेर बसलो होतो. नगरसेवकांना हे अधिकारी जुमानत नसतील तर सर्वसामान्यांचे काय, असाही प्रश्न यावेळी सभागृह नेते ठाकूर यांनी उपस्थित केला. उपमहापौर जगदीश गायकवाड यांनीदेखील अधिकार्‍यांच्या या वर्तणुकीचा यावेळी निषेध केला.