Breaking News
दुसर्या टप्प्यासाठी 20 हजार लस कुप्यांची मागणी
नवी मुंबई : कोविड लसीकरणाला नवी मुंबईत चांगला प्रतिसाद मिळत असून लसीकरणात नवी मुंबईने आघाडी घेतली आहे. शहरात आतापर्यंत सहा हजारांहून अधिक आरोग्य सेवकांना लस देण्यात आली असून यापुढे लसीकरणाची संख्या वाढविण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्यात आली असून आता चौदा केंद्रांवर लसीकरण करण्यात येणार आहे. पालिका प्रशासनाने दुसर्या टप्प्यातील लसीकरणासाठी 20 हजार लस कुप्यांची पालिकेची मागणी शासनाकडे केली आहे.
शहरात 16 जानेवारीपासून चार केंद्रांवर दररोज चारशे जणांचे लसीकरण करण्याचे नियोजन पालिका प्रशासनाने केले होते. त्यानंतर एका केंद्रांची वाढ करीत दररोज एक हजार जणांना लस देण्याचे नियोजन केले होते. त्यानंतर सहा केंद्रांची वाढ करीत आता 14 केंद्रांवर दरदिवशी 1400 आरोग्य सेवकांना लस दिली जात आहे. सोमवारपासून हिरानंदानी, एमजीएम वाशी, माथाडी हॉस्पिटल, तेरणा हॉस्पिटल ही चार केंद्रे वाढविण्यात आली आहेत. पहिल्या टप्प्यात 19085 करोना योद्ध्यांची नोंद झाली असून त्यांना लस देण्यात येणार आहे.
पहिल्या टप्प्यातील लसीकरण लवकरात लवकर संपवत दुसर्या टप्प्याचे नियोजन पालिका प्रशासनाने सुरू केले आहे. पन्नास केंद्रे वाढविण्याची पालिकेची तयारी आहे. दुसर्या टप्प्यातील लसीकरणासाठी पोलीस, जवान, पालिका कर्मचारी, सफाई कामगार, शिक्षक यांना लसीकरण करण्यात येणार असून अशा सर्वांचा समावेश आहे. यासाठी 20 हजार लस कुप्यांची मागणी पालिकेने शासनाकडे केली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai