सिडको देणार एमआरव्हीसीला भूखंड

विरार-डहाणू रेल्वे मार्गाच्या चौपदरीकरणासाठी कोळगाव आणि केळवे येथे भूखंड वाटप

नवी मुंबई ः सिडकोतर्फे मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनला (एमआरव्हीसी) विरार-डहाणू रेल्वे मार्गाच्या चौपदरीकरणासाठी पालघर जिल्ह्यातील कोळगाव येथील सर्व्हे क्र. 223 आणि 224 तसेच केळवे येथील सर्व्हे क्र. 520, 466, 467 आणि 1339 हे भूखंड वाटपित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या भूखंडांचे एकत्रित क्षेत्रफळ 23,689 चौ.मी. इतके आहे. 

सिडकोला विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून आवश्यक त्या इमारती व पायाभूत सुविधांसह पालघर जिल्हा मुख्यालय विकसित करण्यासाठी 440.67 हेक्टर क्षेत्र राज्य शासनाकडून हस्तांतरीत करण्यात आले होते. त्यापैकी 104 हे. वर जिल्हा मुख्यालय विकसित करण्यात आले असून उर्वरित 337 हे. क्षेत्र हे जिल्हा मुख्यालय प्रकल्पासाठी येणारा खर्च भरून काढण्यासाठी सिडकोकडे हस्तातंरीत करण्यात आले होते. 337 हे. क्षेत्राच्या वाणिज्यिक वापराद्वारे पालघर जिल्हा मुख्यालय प्रकल्पासाठी येणारा खर्च सिडकोला वसूल करता येणार आहे. सदर 337 हेक्टर क्षेत्रापैकी 23,689 चौ.मी. भूखंड हा विरार-डहाणू रेल्वे मार्गाच्या चौपदरीकरणासाठी देण्यात यावा अशी विनंती एमआरव्हीसीकडून सिडकोला करण्यात आली होती. 

या सर्व बाबींचा तसेच सार्वजनिक हिताचा विचार करून उपरोक्त भूखंड हे रु. 62,17,41,494 (रु. बासष्ठ कोटी सतरा लाख एकेचाळीस हजार चारशे चौर्‍याण्णव मात्र) भाडेपट्टा अधिमूल्य तसेच लागू असणारे उर्वरित शुल्क आणि सदर प्रकल्पाकरिता कर आकारून एमआरव्हीसीला 90 वर्षांच्या भाडेपट्ट्यावर देण्याचा निर्णय सिडकोकडून घेण्यात आला आहे. उपरोक्त दर हा चालू आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत म्हणजे 31 मार्च 2021 पर्यंत वैध असणार आहे. जीएसटी लागू असल्यास स्वतंत्रपणे भरावे लागेल. वाटपित करण्यात आलेल्या भूखंडांचा वापर केवळ विरार-डहाणू रेल्वे मार्ग चौपदीकरण प्रकल्पाकरिता करता येणार आहे. सदर बाब ही नवीन शहरे भूमी विनिमय अधिनियम, 1992 मधील अधिनयमांच्या अधीन राहिल.     

सार्वजनिक हिताच्या प्रकल्पांना सहकार्य करण्याची भूमिका सिडकोने नेहमीच घेतली आहे. या भूमिकेला अनुसरूनच एमआरव्हीसीला विरार-डहाणू रेल्वे मार्गाच्या चौपदरीकरणासाठी कोळगाव आणि केळवे येथील भूखंड देण्याचा निर्णय सिडकोतर्फे घेण्यात आला आहे. यामुळे या भागातील प्रवाशांचा प्रवास निश्चितच सुखकर होण्यास मदत होणार आहे.
-डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको