लाखो कोरोना चाचणी अहवालांचे परीक्षण

बोगस चाचणी प्रकरण; चौकशी अहवाल लवकरच

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेत बोगस कोरोना चाचणीचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर पालिका आयुक्तांनी या प्रकरणी चौकशी समिती तयार केली होती. या त्रिसदस्यीय चौकशी समितीकडून लाखो कोरोना चाचणी अहवालांचे परीक्षण करण्यात आले असून या प्रकरणाचा चौकशी अहवाल लवकरच सादर केला जाणार आहे.

हयात नसलेल्या आणि चाचणी न केलेल्या नागरिकांचे अहवाल प्राप्त झाल्याचा प्रकार नोव्हेंबरमध्ये समोर आल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे चाचण्यांचा आकडा फुगवण्यासाठी हा आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप तक्रारदारांकडून करण्यात आला होता. याप्रकरणी आयुक्तांनी त्रिसदस्यीय चौकशी समिती तयार केली होती. 

हा प्रकार समोर आला, तेव्हा शहरातील सव्वा दोन लाखांहून अधिक नागरिकांच्या प्रतिजन चाचण्या करण्यात आल्या होत्या, तर सव्वा लाखापेक्षा जास्त नागरिकांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या होत्या. 

कोरोना चाचण्यांचे अहवाल माहिती नोंदणीकार यांनी आयसीएमआरवर अपलोड केल्यानंतर प्राप्त होतात, परंतु प्रतिजन चाचण्यांमध्ये नकारात्मक चाचण्यांचे चाचणी अहवाल भरताना त्यांच्या नातेवाईकांचेही अहवाल तयार करण्यात आल्याने हा गोंधळ झाल्याचे बोलले जात होते. माहिती नोंदणीकारांच्या कामावर सुयोग्य पर्यवेक्षण न झाल्याने हा प्रकार घडल्याची चर्चा होती.