निवडणुकीत महाविकास आघाडीची शक्यता धूसर?

घाऊक इन्कमिंगमुळे तीनही पक्षात जागा वाटपावरुन धुसफूस

नवी मुंबई : राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेस पक्षाने निवडणुकीत तिकीट देण्याचे आश्वासन देऊन घाऊक इनकमिंग केल्याने तीनही पक्षात जागा वाटपावरुन धुसफूस सुरु झाली आहे. कार्यकर्त्यांच्या दबावामुळे काही ठिकाणी एकाच जागेवर तीनही पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी दावा ठोकल्याने तुर्ततरी नवी मुंबई महापालिकेसाठी महाविकास आघाडीची शक्यता धूेसर असल्याची चर्चा सध्या नवी मुंबईत आहे. निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यावर पक्षांतर करून तिकीट मिळवण्याचे स्वप्न पाहणार्‍या उच्छुकांना धडकी भरली आहे.

सध्या नवी मुंबईत निवडणुकीचे वारे जोरात सुरु असून त्यातच निवडणूक यादी जाहीर करण्याच्या कार्यक्रमाला निवडणूक आयोगाने हिरवा कंदील दाखवला आहे. राज्यात शिवसेना, कॉग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडीचे सरकार असून 5 महानगर पालिकांच्या निवडणुका आगामी काळात होणार आहेत. या पाचही महापालिकांच्या निवडणुका सर्वच पक्षांना महत्वाच्या असून त्यावरून राज्याच्या मतदारांचा कल ठरणार आहे. नवी मुंबई महापालिकेची निवडणूक एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता असल्याने हौशे नवशे आणि गवशे यांनी या निवडणुकीत नशीब आजमावण्याची तयारी केली आहे.

नवी मुंबईत विधासभा निवडणुकीच्या तोंडावर गणेश नाईक यांनी राष्ट्रवादीला रामराम करून भाजपात प्रवेश केला. परंतु राज्यात मुख्यमंत्री पदाचा वाद होऊन काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाचे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर नवी मुंबई महापालिकेची निवडणूक असल्याने नाईकांसोबत अनेक वर्ष साथ देणार्‍या विश्वासू नागरसेवकांनी महाविकास आघाडीला जवळ केले. गेल्या चार महिन्यांपासून या पक्षांतराच्या विषाणूची लागण झालेल्या अनेकांनी शिवसेना, राष्ट्रवादी पक्षाला जवळ केल्याने नाईकांना मोठा धक्का मिळाल्याचे मानले जात आहे. अजूनही काही नगरसेवक भाजपाला राम राम ठोकणार असल्याची जरी चर्चा असली तरी पक्षांतर करणार्‍या सर्वानाच तिकीट मिळणार काय याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.  

सध्या महाविकास आघाडीत घाऊक दराने पक्ष भरती केल्याने पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यांनी या बाबत आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या दबावापोटी स्थानिक नेत्यांनी जागांवर दावा सांगण्यास सुरुवात केल्याने बर्‍याच ठिकाणी एका जागेवर तीनही पक्षांच्या नेत्यांचे दावे आल्याने महाविकास आघाडीत गोंधळ उडाल्याचे चर्चा सध्या नवी मुंबईत आहे. जागा वाटपाचा तिढा वरिष्ठ नेत्यांनी सोडवावा अशी मागणी स्थानिक नेत्यांनी केल्याने वरिष्ठांच्या आदेशाने जरी महाआघाडी झाली तरी कार्यकर्ते किती प्रामाणिकपणेे दुसर्‍या पक्षाच्या उमेदवारांचे काम करतील याबाबत आशंका प्रत्येक पक्षाच्या नेत्यांच्या मनात आहे. त्यामुळे आघाडी न करता वेगवेगळी निवडणूक लढवून, गरज असेल तेथे मैत्री पूर्ण लढत देणे आणि निवडणुकीनंतर आघाडी स्थापन करणे असा प्रवाह सध्या जोर धरत आहे. परंतु महाविकास आघाडी व्हावी अशी इच्छा उद्धव ठाकरेंसह शरद पवार यांची असल्याने नवी मुंबईतील स्थानिक नेत्यांसह कार्यकर्त्यांचे लक्ष वरिष्ठांच्या भूमिकेकडे लागले आहे. 

एकाच जागेवर तीनही पक्षांच्या नेत्यांचे दावे 
पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या दबावापोटी स्थानिक नेत्यांनी जागांवर दावा सांगण्यास सुरुवात केल्याने बर्‍याच ठिकाणी एका जागेवर तीनही पक्षांच्या नेत्यांचे दावे आल्याने महाविकास आघाडीत गोंधळ उडाल्याची चर्चा सुरु आहे.