268 कोटींच्या पूलाला आयुक्तांचा हिरवा कंदील

संजयकुमार सुर्वे

सिडको-पालिका उचलणार 50ः50 टक्के बांधकाम खर्च

नवी मुंबई ः कोरोना संक्रमणाची जबाबदारी व्यवस्थित पार पाडल्यानंतर पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नवी मुंबईकरांच्या प्राथमिक सेवा-सुविधांकडे आता लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. नवी मुंबईचा क्वीन ऑफ नेकलेस म्हणून ओळखला जाणारा 9 कि.मी चा पामबीच मार्गाचा प्रवास विना अडथळा व्हावा म्हणून 268 कोटी रुपये खर्च करुन महात्मा फुले जंक्शन ते कोपरी जंक्शन उड्डाणपूलाच्या कामाला हिरवा कंदील दिला आहे. त्याचबरोबर या उड्डाणपूलाचा खर्च सिडको व पालिका 50ः50 टक्के उचलणार आहेत. 

नवी मुंबई महापालिकेने गेली अनेक वर्ष पामबीच मार्गावर उड्डाणपूल बांधण्यासाठी आपल्या अंदाजपत्रकात तरतूद केली होती. परंतु सदर कामास गती न मिळाल्याने अनेक वर्ष हे उड्डाणपूल लालफितीत अडकले होते. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात वाढत्या कोरोना संक्रमणाच्या काळात सरकारने अभिजीत बांगर यांची आयुक्तपदी नियुक्ती केली. त्यांनी नियुक्तीनंतर उचललेल्या ठोस पावलांमुळे व आरोग्य विभागाला केलेल्या मार्गदर्शनाने अल्पावधीत कोरोना संक्रमण नियंत्रणात आले. आता त्यांनी नवी मुंबईकरांच्या मुलभूत समस्यांकडे लक्ष देण्यास सुरुवात केली असून सार्वजनिक वाहतूक, पुनर्विकास, आरोग्य आणि घनकचरा व्यवस्थापन या बाबींना प्राधान्य दिले आहे. 

नवी मुंबईतील क्वीन ऑफ नेकलेस म्हणून ओळखल्या जाणार्‍या पामबीच मार्गावरील प्रवास विना अडथळ्याचा होण्यासाठी त्यांनी 268 कोटी रुपयांच्या उड्डाणपुलाला मान्यता दिली आहे. 2.85 कि.मी लांबीचा हा पुल असून चार पदरी मार्गिका असणार आहेत. महात्मा फुले जंक्शन येथून सुरु होणारा हा पुुल कोपरी जंक्शन येथे संपणार आहे. या पुलामुळे वाहनचालकांची सहा सिंग्नल पासून मुक्ती होणार आहे. हा पुल बांधायला 24 महिन्यांचा कालावधी लागणार असून त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरु करण्यास संमती आयुक्तांनी दिली आहे. या पुलाचा खर्च सिडको व पालिका 50ः 50 टक्के उचलणार आहेत. पामबीच मार्गावरील 50 टक्के वाहनचालक थेट उड्डाणपुलाचा वापर करुन ठाणे-बेलापुर रोडवर उतरणार असल्याने शहरातील वाहतुक कोंडी फुटण्यास मदत होणार आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ व इंधन याची बचत होणार आहे. देशात प्रथमच पुल बांधणार्‍या कंत्राटदारालाच दोष निवारणाचे काम 20 वर्ष करण्याची अट या निविदेत आयुक्तांनी घातल्याने कामाच्या दर्जात कुठल्याही प्रकारचा समझोता होणार नसल्याचे शहर अभियंता सुरेंद्र पाटील यांनी सांगितले. 

या उड्डाणपुलावरुन कोपरी मार्गे शहरात येणार्‍या प्रवाशांना थेट वाशी-तुर्भे रोडवर जाण्यासाठी वेगळा मार्ग बांधण्यात येणार आहे. त्याचबरोबर महात्मा फुले जंक्शन जवळून वाशीतील नाल्यावर पुल बांधून हा रस्ता थेट सायन-पनवेल महामार्गाला जोडण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांना सायन-पनवेल महामार्गावर जाण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे. यासाठी पालिकेने 7 कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया सुरु केली आहे. पाच वर्षानंतर लागणार्‍या पायाभुत सुविधांची गरज ओळखून वेळीच पावले उचलणार्‍या आयुक्तांच्या या निर्णयाचे स्वागत नवी मुंबईकरांकडून होत आहे. 

  1. देशात प्रथमच नवी मुंबईत 20 वर्षांचा दोष निवारण कालावधी ही संकल्पना राबविली जात आहे. 
  2.  यापुर्वी हा कालावधी 1 ते 3 वर्षाचा असल्याने ठेकेदाराला सदोष कामासाठी जबाबदार धरता येत नव्हते. 
  3.  परंतु आता हा कालावधी 20 वर्षांचा केल्याने सदोष कामासाठी ठेकेदार जबाबदार राहणार आहे. 
  4. सायन-पनवेल महामार्गाला जोडणार्‍या पर्यायी मार्गासाठी अतिरिक्त 7 कोटींची निविद
अरेंजा ते कोपरी उड्डाणपूलामुळे वाहतुक कोंडीपासून नवी मुंबईकरांची मुक्तता होणार आहे. नागरिकांना या उड्डाणपूलामुळे शहरातून झटकन ठाणे-बेलापुर रस्त्यावर जाता येणार आहे. यामुळे इंधन, वेळेची बचत होणार आहे शिवाय या मार्गावर होणारे अपघात टाळले जाणार आहेत. नवी मुंबईकरांची भविष्याची गरज लक्षात घेऊन हे काम हाती घेतले आहे. - अभिजित बांगर, आयुक्त, न.मुं.म.पा